सामाजिक हित जोपासणे हेचं, खरे देश प्रेम - अँड. शाळीग्राम होडगर
◻️ याठिकाणी विद्यार्थ्याच्या भविष्याला दिशा दिली जाते - भगवानराव इलग
◻️मांचीहिल शैक्षणिक संकुलात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून गरीब असो अथवा श्रीमंत सर्वाना एकाचं मताचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जातीयवाद आणि धर्मवाद यामध्ये अडकू नका. समाजामध्ये आनंद निर्माण करताना सार्वजनिक मालमत्तेची जपणूक करणे गरजेचे आहे. कारण सार्वजनिक आणि सामाजिक हित जोपासणे हेचं, खरे देश प्रेम आहे. असे प्रतिपादन मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक, वैद्यकीय आणि औद्योगिक संकुलामध्ये भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव इलग यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर ज्ञानगंगा विद्यानिकेतन व महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी राष्ट्र ध्वजाला एनसीसी संचलन करत मानवंदना दिली.
अँड. शाळीग्राम होडगर पुढे म्हणाले की, आपण सर्व मानव जात ईश्वराने पृथ्वीवर पाठवलेली एक सुंदर कलाकृती आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला मोठ्या कष्टातून आणि रक्त सांडून मिळालेले आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
आज माणसा - माणसात द्वेषाची प्रेरणी केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या अंतरंगातली शिस्त जोपासण्याची गरज असल्याचे सांगून जर आपण प्राण्यांवर प्रेम करायला शिकलो तर, माणसांवर सुध्दा प्रेम करण्याची भावना आपल्यात निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.
तसेच ‘योगक्षेम’ या वाक्याचा अर्थ सांगताना, “योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त करणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेल्या वस्तूंचे संवर्धन करणे" असा अतिशय व्यापक अर्थ आपल्या पूर्वजांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान यावेळी मांचीहिल संस्थानातील सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातून आलेले नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव इलग यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मांचीहिल शैक्षणिक संकुलातील कार्य आणि प्रगतीचे कौतुक केले. “हे संकुल होडगर साहेब यांनी दुरदृष्टी आणि मोठ्या कष्टाने उभे केले” असल्याचे सांगुन याठिकाणी राबवले जात असलेले उपक्रम हे विद्यार्थ्याच्या भविष्याला दिशा देणारे ठरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.
***फोटो सौजन्य :- भाऊसाहेब ताजणे