प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १९ रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप
◻️ अकोले, संगमनेर, नगर, कोपरगाव आदि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या १९ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई कार्यालयाकडून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिकाच्या जागेवर १४ व ५ नवीन सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अशा एकूण १९ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. १ रुग्णवाहिकाची किंमत रु. १७ लक्ष ९५ हजार असून १९ रुग्णवाहिकांसाठी एकुण ३ कोटी ४१ लक्ष ५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
रुईछत्तीशी ता. नगर, लाडगांव ता. अकोले, खर्डा ता. जामखेड, शिऊर ता. जामखेड, सोनेगांव ता. जामखेड, संवस्तर ता. कोपरगांव, वारी ता. कोपरगांव, वाकडी ता. राहाता, अस्तगांव ता. राहाता, डोऱ्हाळे ता. राहाता, सावळीविहीर ता. राहाता, तिसगांव ता. पाथर्डी, भातकुडगांव ता. शेवगांव, दहिगांव ता. शेवगांव, आढळगांव ता. श्रीगोंदा, काष्टी ता. श्रीगोंदा, म्हैसगांव ता. राहुरी जोर्वे ता. संगमनेर आणि कोंभळी ता. कर्जत या प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात आल्या.