प्रतापपूर शिवारात एक बिबट्या जेरबंद, मात्र, दहशत कायम!
◻️ नर आणि मादी बिबट्या सह पिल्लांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
◻️ मागील गुरुवारी बिबट्या कडून झाला होता दोघांवर हल्ल्यांचा प्रयत्न
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात मागील आठवड्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यातुन दोघे जण थोडक्यात बचावले होते. त्यामुळे वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावला असता एक बिबट्या मध्यरात्री जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील आठवड्यात गुरुवारी सायंकाळी संकल्प अर्जुन आंधळे आणि सुनील बबन आंधळे यांच्यावर सर्जेराव नाना आंधळे यांच्या वस्तीनजीक बिबट्या हल्ला करण्याच्या हेतूने चालून आला होता. मात्र दोघांनी यावेळी प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून धुम ठोकली होती. या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती.
या मागणीची दखल घेऊन सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वनविभागाने हिराबाई रंभाजी इलग यांच्या गट नंबर ३५०/३ मध्ये पिंजरा लावला होता. मध्यरात्री बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकल्यानंतर डरकाळी फोडून आणि पिजंऱ्याला दणके मारत बिबट्याने परिसर दणाणून सोडला. सकाळी वनविभागाने या बिबट्याला निबांळे येथील रोपवाटिकेत हलवले. तर, तो मादी बिबट्या असल्याची माहिती दिली असली तरी, हल्ला करण्याच्या उद्देशाने चालून येणारा बिबट्या हांच होता का? याबाबत संभ्रम मात्र कायम आहे.
दरम्यान याचं परिसरात नर आणि मादी बिबट्या सह तीन ते चार पिल्लांचा वावर देखील नियमित पणे पहावयास मिळत असल्याचे स्थानिकाचे म्हणने आहे. त्यामुळे या परिसरात आणखी पिंजरे लावुन बिबट्याचे व त्याचे पुर्ण कुटुंब जेरबंद करुन नागरीकाची दहशतीतून मुक्तता करावी अशी मागणी जेष्ठ नेते भगवानराव इलग, शिवाजी इलग, दिनकर आंधळे, सर्जेराव आंधळे, सुनिल इलग, पप्पू इलग, भाऊसाहेब आंधळे, निवृत्ती आंधळे, बाळासाहेब आंधळे, अर्जुन वाकचौरे आदिनी केली आहे.