अपयशावर मात करुन यश मिळवण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे

संगमनेर Live
0
अपयशावर मात करुन यश मिळवण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे 

◻️ व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे संगमनेर येथे प्रतिपादन

◻️ एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन 

संगमनेर LIVE | लोकशाहीची मूल्य रुजवणारा आदर्श राजा, उत्तम प्रशासन, दूरदृष्टीचे नेतृत्व, शूरता आणि उत्तम व्यवस्थापन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र हे प्रत्येकासाठी यशाचे पैलू निर्माण करून देणारे आहे. अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे.

संगमनेर येथे एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने राजे शिवछत्रपती यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर, विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, तेजस गोरडे, शैलेश आहेर, ऋषी काकड ,साहिल गुंजाळ, सोहम पलोड, आदित्य चकोर, मयूर कांडेकर, यश कांडेकर, प्रसाद गुंजाळ, स्वरूप राहणे, ओम शिंदे, ओम जाधव, राजआयर्न काकड आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

प्रा. शिंदे म्हणाले की, इतिहासातील उत्तम प्रशासक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे जग पाहते. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो आपल्या सर्वांसाठी अभिमान आहे. हा प्रेरणादायी इतिहास तुम्हाला जीवन जगायला शिकवेल. महाराजांचे साहस , शूरता, दूरदृष्टी याबरोबर व्यवस्थापन हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. ज्या ज्या वेळेस जीवनामध्ये अपयश येईल त्याच्या वेळेस तुम्हाला महाराजांचे चरित्र प्रेरणा देईल.

अफजलखानाच्या वधानंतर संपूर्ण अवघ्या १८ दिवसात महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी निवडले, हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधला. तर बाजीप्रभू, तानाजी, येसाजी कंक, बहिर्जी नाईक असे अनेक मावळे घेऊन स्वराज्य निर्माण त्यांनी केले.

महाराजांनी निर्माण केलेले गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. किंबहुना जगातील लोक हे गड किल्ले पाहण्यासाठी आले पाहिजे. कमबॅक करण्यासाठी शिवचरित्र प्रत्येकाला प्रोत्साहन देत असून तुलना करणे बंद केल्याने माणसाचे दुःख कमी होईल असे ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक नागरिकाचे प्रेरणास्थान आहे. महाराजांचा इतिहास हा प्रत्येकाला स्फूर्ती देतो. सर्व धर्म समभाव आणि मानवतेचा विचार घेऊन पुढे जाण्यासाठी सर्वांनी काम करावे.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रधर्म हा समानता शिकवतो. सर्वांना पुढे घेऊन जाणारा हा महाराष्ट्र धर्म असून हा जपण्यासाठी प्रत्येक तरुणाने कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन अहिर यांनी केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील नागरिक महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुपुत्र संभाजी नाटकातील १४७ कलाकारांचा सत्कार..

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी नाटकांमध्ये संगमनेर तालुक्यातील १४७ कलाकारांनी सहभाग घेतला होता. या सर्व कलाकारांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह घेऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !