बहुचर्चित पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार!
◻️ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी आमदार अमोल खताळ यांची सकारात्मक चर्चा
संगमनेर LIVE (नवी दिल्ली) | बहुचर्चित पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी केली आहे. या संदर्भात आमदार खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालय भेट घेत वस्तुस्थिती मांडली आहे. या भेटीवेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. यावेळी रेल्वेमंत्र्यानी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल. याबाबत सकारात्मकता दर्शवल्याची माहिती मिळाली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जावा याबाबतचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा सविस्तर उल्लेख केला आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे हे देखील उपस्थित होते.
संगमनेर हा पुणे - नाशिक दरम्यानचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, येथून दररोज हजारो प्रवासी पुणे आणि नाशिकला प्रवास करतात. तसेच, हा परिसर कृषी आणि औद्योगिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. संगमनेर तालुका ड्रॅगनफ्रूट, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला यांसारख्या शेती उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे.
या रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल, तसेच वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. औद्योगिक दृष्टिकोनातूनही हा मार्ग फायदेशीर असून, संगमनेर आणि आळेफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. रेल्वे मार्गामुळे उद्योगांना अधिक सुविधा मिळतील, परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. असे म्हटले आहे.
याशिवाय संगमनेर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे - नाशिकला जातात. रेल्वेमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, पुणे - नाशिक रेल्वे मार्ग GMRT (Giant Metrewave Radio Telescope) मुळे अडथळा निर्माण होत असल्याचे वृत्तपत्रातून समोर आले होते. मात्र, या मुद्द्यावर सखोल चर्चा करून योग्य पर्याय काढण्याचा निर्णय रेल्वेमंत्री यांनी घेतला. संगमनेर, आळेफाटा, आंबेगाव, राजगुरुनगर या मार्गावरूनच रेल्वे जाईल, अशी खात्री दिली आहे.
संगमनेरसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. “आम्ही सतत पाठपुरावा करत असून, पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार याचा आम्हाला विश्वास आहे. या निर्णयामुळे शेतकरी, उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे,” असे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगितले.