संस्कारक्षम मन घडविणारे आबा!
माझे वडील लोकनेते यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने त्यांना प्रगतीपथावर जाण्याकरिता उदंड आयुष्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
माजीमंत्री बाळासाहेब थोरात कौंटुबिक नात्याने माझे वडील असले तरी सार्वजनिक जीवनात ते माझे गुरु असून एक दिशादर्शकही आहेत. माझ्या व्यक्तिगत जीवनाचा ते आधारस्तंभ आहेत. आम्ही सर्वजन घरामध्ये त्यांना आबा म्हणतो. माझे आजोबा स्वातंत्रसैनिक स्व. भाऊसाहेब थोरात व आजी मथुराबाई यांनी आबांवर जे संस्कार केले, जी शिकवण दिली, तेच संस्कार आबांनी आम्हा भावंडावर केले.
माझे आई - अजोबा खरोखरच खूप धन्य आहेत, की त्यांनी त्याकाळी आबांना जनसेवेचा मंत्र दिला. विनम्र स्वभाव, प्रसन्न मद्रा, दुसऱ्याचा आदरभाव करणे, सर्वांना समानतेने वागविणे अशा अनेक गुणांनी युक्त त्यांना एक आदर्श व्यक्तीमत्व बनवलंय, त्यांच्याविषयी लिहीतांना कितीही लिहले तरी ते कमीच पडेल.
माझ्यासाठी थोरात कुटूंबामध्ये जन्माला येणे, तेही बाबांची नात होण्याचे व आबांची मुलगी होण्याचे भाग्य मला मिळाले ही खरोखरच पूर्वजन्माची पुण्याई आहे. मोठी ऐतीहासीक, राजकीय, सामाजिक परंपरा असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला येवून साधेपणा जपणे तेवधे सोपे नाही. परंतू बाबांच्या व आबांच्या संस्कारांनी आम्हाला तो साधेपणा शिकविला. आम्हा भावंडात शुद्ध विचार व संस्कार घडविण्यासाठी आबा खूप दक्ष होते.
मला अजूनही वसतिगृहातील दिवस आठवतात. मी प्रवरानगरच्या प्रवरा विद्या कन्यामंदिर या शाळेत के. जी. च्या वर्गात असतांना आबा मोटारसायकलवर मला भेटण्यासाठी लोणीला आले. माझ्यासाठी लाल रंगाच्या बांगड्या व बिस्कीटचे पुडे आणले होते. तो क्षण खरोखरच अविस्मरणीय आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या वसतीगृहामध्ये आम्ही तीनही बहिणी मी सविता आणि जया शिकत असतांना आबा नेहमी आम्हाला भेटायला यायचे. वसतीगृहाचे नियम त्यांनी कधीही मोडले नाही. स्वःताचे वेगळेपण त्यांनी कधीही दाखविले नाही. शाळेची फी ते नियमीत भरत असत. कर्तव्यदक्ष वडील म्हणून त्यांची भूमिका ते आजही योग्य रितीने पार पाडतात.
राजकारणात यशस्वी होतांना कुटुंबातील भावनिक नातेसंवध जपण्याचा ते कायम प्रयत्न करतात. कळत न कळत केलेल्या संस्कारांचे बालपणी फारसे महत्व वाटले नाही. परंतू आज क्षणोक्षणी त्यांचे संस्कार किती प्रभावी आहेत याची जाणीव होते. आबा घरातल्या नोकराला नोकर म्हणून कधीच वागवत नाही तर तो आपल्या कुटूंबातील एक घटक आहे असे ते मानतात. हीच शिकवण आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या मनात त्यांनी रुजविली. आजही आम्ही प्रत्येकाला नावाने हाक न मारता काका, मावशी, ताई असे आदरपूर्वक संबोधित असतो. प्रत्येक छोट्या - छोट्या गोष्टीची आबा आम्हाला जाणीव करुन देत असतात.
घरात मुलीने स्वयंपाक केला पाहिजे, मुलींना चुलीवर स्वयंपाकाची सवय लागली पाहिजे, घरी प्रत्येकाचे आदरातिथ्य करणे, इतरांच्या भावना समजावून घेणे, प्रत्येकाशी समरस होणे यासांरख्या अनेक गोष्टींची जाणीव ते आम्हाला सतत करुन देत असतात. घरी आलेला प्रत्येकजण मग तो पाहुणा असो वा कार्यकर्ता चहा, जेवण घेतल्याशिवाय जावू नये अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. बाबा आणि आबा यांनी कधीही मंदीरात देव शोधण्याचा प्रयत्न केला नाही ते मानसातच देव मानतात व मानसाचीच सेवा करतात.
संस्कारांची परंपरा माहेरप्रमाणे सासरीसुद्धा जपली जावी याकडे त्यांचे लक्ष असते. कामाचा तिढा प्रचंड व्याप असतांनासुद्धा आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल याची देखील ते काळजी घेतात. घरातील माणसांसाठी आपण स्वतः स्वयंपाक करावा, पोटाची नाळ आणि हदयाची नाळ एकमेकांना जोडलेली असते अशीच त्यांची आम्हाला शिकवण आहे.
आई ज्या गोष्टी जाणीवपूर्वक शिकविते त्या आबांनी सुद्धा आम्हाला शिकविल्या. अगदी घरातल्या सासूबाईशी कसे वागावे, घरातल्या प्रत्येकाच्या भावना कशा समजावून घ्याव्यात, कोणी काही बोलले तरी त्याचा चांगलाच अर्थ घ्यावा, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी आमच्या मनावर बिंबविल्या आहेत. सासरी गेल्यानंतर सारखा मोबाईल फोन वापरायचा नाही, याचीसुद्धा समज त्यांनी मला दिली होती. वातारणाशी समरस व्हायचे हेच त्यांचे सांगणे असते. माझ्यापेक्षा ते माझ्या सासरच्यांचे जास्त कौतुक करित असतात.
त्यांच्या संस्कारामुळेच कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याची ताकद आम्हाला मिळाली, जगण्याचे बळ मिळाले. आजही कोणी काही बोलले, रागावले तर आमच्याकडून उलट उत्तर दिले जात नाही. त्यामुळे माझ्या मुलीनेसुद्धा घरातील, शेतावरील नोकराच्या, मजुराच्या मुलांशी खेळावे, सगळ्यांकडे जावे असेच मला वाटते. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे आम्हाला कधीच वाटत नाही. याचे कारण बाबांनी व आबांनी आमच्यावर केलेले संस्कार हेच आहेत.
आज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत काम करित असतांना एखादे काम जेव्हा त्यांच्याकडे घेवून जाते तेव्हा ते काम करतांना ते तेथील प्राचार्य, व्यवस्थापणाचे अधिकारी या सगळ्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतात. केवळ माझ्या एकटीवर कधीच विश्वास टाकत नाहीत.
राजकारण, समाजकारण करीत असतांना त्यांची प्रचंड धावपळ असते. कामाचा व्याप असतो. तरीसुद्धा आबा सकाळी जेवढे उत्साही असतात, तेवढेच उत्साही ते रात्रीसुद्धा असतात. थोडा वेळ मिळाल्यास १० मिनीटांची विश्रांती घ्यायचे ठरवले आणि एखादा कार्यकर्ता कामानिमीत्त आपल्याकडे आल्याचे समजले तर ते लगेच उठून त्यांच्याशी उत्साहाने चर्चा करतात. सतत कामात मग्न, आचार विचारांतील साधेपणा यांमूळेच त्यांचे आरोग्य चांगले आहे असे मला वाटते.
त्यांच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमीत्ताने एका आजींशी जेव्हा माझा संपर्क आला तेव्हा त्या आजी मला म्हणाल्या तुझ्या आजीने मुलाला असे कोणते बाळकडू पाजले कि ज्यामुळे इतका चांगला मुलगा घडवता आला? त्या आजींच्या प्रतिक्रियेने सामान्य माणसांच्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे, आबा किती संवेदनशील मनाचे आहेत याचा प्रत्यय मला आला. त्यांना यशस्वी होण्यासाठी माझी आई म्हणजे जिजी कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आबा बाहेर असतांना घरचा कारभार ती सक्षमपणे सांभाळते.
आबांनी राजकीय जीवन आणि सामाजिक जीवन यांच्यात समतोल ठेवला. कुटूंबाबरोबर बाहेर जाणे, जेवण झाल्यावर कुटूंबातील सगळ्यांशी गप्पा मारणे, घरगुती किंवा नातेवाईकांच्या समारंभ व कार्यक्रमांना उपस्थित राहणे यासाठी ते आवर्जून वेळ काढतात. माझी मुलगी रुक्मिणी हिच्याशीसुद्धा ते तेवढ्याच आपूलकीने गप्पा मारतात.
वडील व मुलीचे नाते कसे असावे याचे आबा एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून राज्यासाठी ते एक कतृत्ववान नेता असले तरी, माझ्यासाठी एक सह्दय पिता आहेत. मला जर पुनर्जन्म मिळाला तर, पुन्हा यांचीच मुलगी म्हणून मिळावा हेच परमेश्वराकडे माझे मागणे आहे.
आबांचा उत्तरोत्तर उत्कर्ष होवो, त्यांच्या हातून समाजाची अखंड सेवा घडो, त्यासाठी त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने मी प्रभुचरणी प्रार्थना.
सौ. शरयू रणजित देशमुख