प्रतापपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यातून दोघे थोडक्यात बचावले!
◻️ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे गुरुवारी सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यातुन दोघे जण बाल - बाल बचावले आहेत. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी संकल्प अर्जुन आंधळे हा मुलगा दुध घालण्यासाठी चालला होता. यावेळी सर्जेराव नाना आंधळे यांच्या वस्तीनजीक भक्ष्याच्या शोधात दबा धरून बसलेला बिबट्या संकल्प यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतूने चालून आला.
मात्र संकल्पने वेळीचं प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून धुम ठोकली. तर काही वेळापूर्वी यांचं परिसरात सुनिल बबन इलग यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दोघेही थोडक्यात बचावल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान याचं परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने बिबट्याच्या दहशतीतून नागरीकाची सुटका व्हावी यासाठी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा. अशी मागणी दिनकर आंधळे, सर्जेराव आंधळे, सुनिल इलग, भाऊसाहेब आंधळे, निवृत्ती आंधळे, बाळासाहेब आंधळे, अर्जुन वाकचौरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.