सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्यात समृद्धी - बाळासाहेब थोरात
◻️ माजी मंत्री थोरात यांच्याकडून स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपले कुटुंब मानले. गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. संगमनेर तालुक्याची विकासकामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे. हे वातावरण चांगले राहावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असल्याचे अभिवादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर आयोजित १५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी अगदी तरुण वयात स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. संगमनेर अकोले तालुक्यातील सहकाऱ्यांसह ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता सहकाराचा मार्ग निवडला. तालुका हे आपले कुटुंब म्हणून आयुष्यभर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. त्यांनी केलेल्या विकासाच्या पायाभरणीतून आज संगमनेर तालुका उभा राहिला आहे.
येथील सहकार शिक्षण, सामाजिक सलोखा, बंधुभावाचे वातावरण भरलेली बाजारपेठ ही अनेक दिवसांच्या कामातून निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन हे चांगले वातावरण ठेवून तालुक्याचा विकास व समाज जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आपण काम करत आहोत.
वारकरी संप्रदायाने सर्व जाती धर्म यांना मानवतेचा धर्म शिकवला असून सहज सोप्या पद्धतीने अध्यात्माचा मार्ग शिकवला आहे. हरिनामाचा जप अंतकरणापासून केल्याने प्रार्थना पूर्ण होते. संतांचे विचार घेऊन मानवतेच्या विकासासाठी प्रत्येकाने चांगले आचरण करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विनोद राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रघुपती राघव राजाराम, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, संत गाडगेबाबांचे आदत बुरी सुधारलो बस होगा भजन, संत नामदेवांचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे विविध भजन सादर केले. ज्या भजन संगीत कार्यक्रमाचे निवेदन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी केले.यावेळी अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृतमंथन मधील प्रसंगाने सर्व मंत्रमुग्ध..
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आत्मचरित्र अमृत मंथन व अमृत गाथा या पुस्तकांचे ऑडिओ बुक तयार केले आहे. स्टोरी टेल ॲप व युट्यूबवर उपलब्ध असलेल्या गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजातील काही प्रसंग आज या कार्यक्रमात ऐकवल्याने उपस्थित सर्व कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले.