अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेवरील कबीराचे आघात औचित्यपूर्ण
◻️ प्रसिद्ध कबीर पद गायिका कविता खरवंडीकर यांचे प्रतिपादन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | स्वतःचे अनुभव, ज्ञान आणि बुद्धी यांच्या आधारे विचार करण्याची आणि वर्तनाची भारताची परंपरा सध्या जाणीवपूर्वक खंडित केली जाते आहे. भारताला आधुनिक आणि प्रगतिशील करण्यासाठी अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेवर संत कबीराने आपल्या दोह्या मधून केलेले आघात सद्यस्थितीत स्मरणे औचित्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कबीर पद गायिका कविता खरवंडीकर यांनी केले.
प्रख्यात साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या कविता आणि संत कबीर यांच्या कालातीत रचनांच्या गायनाची सुरेल मैफल महिला दिन महोत्सवाच्या निमित्ताने स्नेहालय संस्थेत आयोजिण्यात आली होती. यावेळी हार्मनी - द परफेक्ट ट्यून यांची प्रस्तुती असणारा जगणे ते होते सुंदर, हा कार्यक्रम
स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे संपन्न झाला.
प्रसिद्ध संगीतकार आणि सामाजिक जाणीव जपणारे मानसग्राम प्रकल्पाचे आधारस्तंभ मानसोपचार तज्ञ डॉ. नीरज करंदीकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कबीर पद गान आणि डॉ. अवचट यांच्या कवितांचे गायन कविता खरवंडीकर यांनी केले. त्यांना तबल्याची साथ धनंजय आणि हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर यांनी केली. संगीतरचना धनंजय खरवंडीकर यांच्या होत्या.
जगणे ते होते सुंदर, हा डॉ. अवचट यांच्या कवितांचा दृकश्राव्य माध्यमातून सांगीतिक आविष्कार प्रथमच नगरमध्ये झाला. पुणे येथील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी आणि श्रुती खरवंडीकर यांची साथ यात लाभली. निर्मिती आणि निवेदन खरवंडीकर दाम्पत्यांने केले.
डॉ. नीरज म्हणाले की, अलीकडे संगीतकार आधी चाली तयार करून त्यात शब्द गुंफण्याचे काम गीतकारांवर सोपवतात. परंतु संत कबीर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेल्या दोह्यांना आणि डॉक्टर अवचट यांनी मागील दीड दशकात लिहिलेल्या काव्यरचनांना अनुरूप चाली लावणे हे प्रचंड मोठे आव्हान होते.
खरवंडीकर दांपत्याने लावलेल्या सर्व चाली चपखल आणि मनात रेंगाळणाऱ्या आहेत. नगरचा मागील शतकातील संगीताचा गौरवशाली इतिहास घडवण्यात डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर, डॉ. मनोहर बोपर्डीकर आणि केसकर यांचे असामान्य योगदान होते. हा संगीत वारसा कविता, धनंजय, मकरंद आणि धनश्री खरवंडीकर सक्षमतेने पुढे चालवत असल्याचे डॉ. करंदीकर म्हणाले.
दरम्यान यावेळी ज्येष्ठ गायक पवन नाईक यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.