बालविवाह उघडकीस ; वरासह इतरावर गुन्हा दाखल
◻️ साखरपुडा म्हणत अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह उरकला
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील एका गावात बालविवाह झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत ग्रामसेवक अनिल वाणी यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मुलीचे आई - वडील, वरासह त्याचे आई - वडील, पुरोहित आणि विवाहास उपस्थित असलेल्या अनोळखी लोकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका पंधरा वर्ष वय असलेल्या मुलीचा एकाशी बालविवाह झाला होता. ही गंभीर बाब मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामसेवक अनिल वाणी यांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कळवली. त्यासह गुपचूपपणे उरकलेल्या बालविवाह आणि लग्नपत्रिकाचे फोटोही टाकले.
याची बालविवाह समितीने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची खात्री केली असता मुलीचे आईवडील व मुलाचे आईवडील यांनी आम्ही साखरपुडा केला असून लग्न नंतर करणार असल्याचे सांगितले. तसेच या विवाहासाठी पुरोहित म्हणून काम पाहिलेल्या ब्राह्मणाने देखील हा साखरपुडा केला असून लग्न झालेले नाही असे सांगितले.
मात्र, उपलब्ध पुरावे, फोटो आणि इतर कागदपत्रांनुसार ग्रामसेवक अनिल वाणी यांनी आश्वी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीचे आई - वडील, वरासह त्याचे आई - वडील, पुरोहित यांच्यासह विवाहास उपस्थित असलेल्या अनोखळी लोकांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.