मेंढवन येथे तीन चिमुकल्या मुलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू
◻️ परिसरात शोककळा ; नागरिकांनो मुलांची काळजी घ्या!
संगमनेर LIVE | शनिवारी अतिशय ह्रदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील तीन मुली या खेळण्यासाठी गेल्या असता त्या शेततळ्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की अनुष्का सोमनाथ बडे (वय - ११), सृष्टी उत्तम ठापसे (वय - १३), वैष्णवी अरुण जाधव (वय - १२), या आज दि. १५ जून रोजी दुपारी शाळेतून घरी आल्या होत्या. त्यानंतर जेवण करून त्या सोमनाथ बडे यांचे शेताकडे गेल्या. यावेळी अर्धवट सुरू शेततळ्यात कामात पावसाचे पाणी साचले होते. या मुली ह्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघी बुडाल्या. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी सहकार्यासह घटस्थळी धाव घेतली. तर याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.