संगमनेर तालुक्यात ‘महेश नवमी’ उत्साहात साजरी
◻️ विविध स्पर्धा सह आधार कार्ड दुरुस्ती व आयुष्यमान भारत कार्ड या शिबिर संपन्न
◻️ मिरवणुकी दरम्यान पेढे, जलपान व आईस्क्रीमचे वितरण
संगमनेर LIVE (अजय जावू) | माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिन म्हणून ‘महेश नवमी’ देशभर मोठ्या प्रमाणात साजरी होते. याचाच भाग म्हणून संगमनेर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने देखील महेश नवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा सह आधार कार्ड दुरुस्ती व आयुष्यमान भारत कार्ड या शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते, असे तालुकाध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी सांगितले.
महेश नवमीनिमित्त नूतनीकरण करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, राजेश मालपाणी, गिरीश मालपाणी, सरपंच विश्वनाथ कलंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या महेश भगवानच्या शोभायात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुरुषांचे पांढरे ड्रेस तर महिलांनी परिधान केलेल्या लाल पिवळ्या साडीने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले होते. बालाजी मंदिर - छत्रपती शिवाजी चौक - नवीन नगर रोड - लिंक रोड - मेन रोड ते बालाजी मंदिर या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ झाली.
मिरवणुकी दरम्यान महेश पतसंस्थेच्या वतीने पेढे, संगमनेर मर्चंट बँकेच्या वतीने जलपान व आईस्क्रीमचे वितरण करण्यात आले. निलेश जाजू यांनी या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली तर समारोपप्रसंगी अल्पोपहार सेवा श्रीनिवास राजेंद्रप्रसाद सोमाणी परिवार व आईस्क्रीम सेवा युवा महेशच्या वतीने होती.
आयर्न मॅन, टॅग ऑफ वॉर, जलद चालणे, कॅरम, बुद्धिबळ, माहेश्वरी ट्रेझर हंट, क्रिकेट, म्युझिकल हौजी आदी स्पर्धाचा यामध्ये समावेश होता. यासोबतच आधार कार्ड दुरुस्ती व आयुष्यमान भारत कार्ड च्या शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकी ४ सदस्यांसह असलेल्या १२ टीम ने ट्रेझर हंट स्पर्धेचा विशेष आनंद घेतला. विजयी कोणीही होवो पण ह्या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद लुटणे आम्हाला आवडते असाच बहुतेक स्पर्धकांचा सुर होता.
मालपाणी ग्रुपच्या वतीने ‘स्पोर्ट कार्निवल’साठी मालपाणी हेल्थ क्लब तर विविध कार्यक्रम यांसाठी ‘मालपाणी लॉन्स’ उपलब्धते बरोबरच भरीव आर्थिक सहकार्य केले. तर शोभायात्रा व स्नेहभोजनचे नियोजन राजस्थान युवक मंडळाने केले. या सर्वांचे संगमनेर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
दरम्यान महेश नवमी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, उपाध्यक्ष संजय रा. मालपाणी, सचिव जुगलकिशोर बाहेती, सहसचिव जयप्रकाश भुतडा, कोषाध्यक्ष सुजित खटोड, संघटन मंत्री सचिन मणियार यांचे सह मालपाणी पंच ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश मालपाणी, सरपंच विश्वनाथ कलंत्री, उत्सव समिती प्रमुख अतुल झंवर व महेश नवमी उत्सव प्रकल्प प्रमुख रोहित मणियार व ओम इंदाणी यांनी विशेष प्रयत्न केले. स्पोर्ट कार्निवल युवा संघटनच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.