उंबरी बाळापूर सह आश्वी परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
◻️ शेतकऱ्यांचे नुकसान, शेडचे पत्रे उडाले, झाडे कोलमडले, परिसरात वीज पुरवठा खंडीत
संगमनेर LIVE (आश्वी) | बुधवारी दुपारनंतर अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, ओझर, माळेवाडी, शिबलापूर आणि परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पीकाचे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. तर वृक्ष उन्मळून पडले असून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
बुधवारी सकाळपासूनचं आश्वी सह परिसरात वातावरण दमट झाले होते. त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. दुपारनंतर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. आर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने रौद्र रुप धारण केल्याने आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, ओझर, शिबलापूर, प्रतापपूर परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली.
दरम्यान या वादळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पीकाचे देखील नुकसानीसह शेडचे पत्रे उडाले तर वीजेचे खांब देखील वाकले असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
शिबलापुर येथील एकनाथ सखाराम नागरे यांच्या राहत्या घराचे तसेच ट्रांसफार्मर रिपेरिंग वर्कशॉपचे साधारण ७ ते ८ लाख रुपयाचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीचे पंचनामे करावे अशी विनंती सरपंच प्रमोद बोंद्रे, प्रकाश शिंदे, गंगा म्हस्के, डॉ. नितीन काळेबाग आदिनी केली.