संगमनेरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आ. अमोल खताळ यांनी वेधले सरकारचे लक्ष

संगमनेर Live
0
संगमनेरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आ. अमोल खताळ यांनी वेधले सरकारचे लक्ष

◻️ अधिवेशनात सरकारकडे विविध मागण्याकरत निधीसाठी धरला आग्रह



संगमनेर LIVE | मुंबई येथे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर मतदार संघातील विविध प्रश्नांवर राज्य शासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने सर्वोतोपरी मदत करावी अशी आग्रही मागणी अधिवेशनात केली.

संगमनेर मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासनाने घालून दिलेल्या किचकट अटींमुळे मंजुरीसाठी सात - आठ दिवस लागतात. त्यामुळेच सर्वसामान्य जनता तहानलेली राहत आहे. त्यामुळे शासनाने टँकर मंजुरीसाठीच्या सर्व अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी आमदार खताळ यांनी विधानसभेत केली. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या टेबलांवर वेळ दवडण्याऐवजी तातडीने मंजुरी द्यावी. पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने या प्रश्नात प्रशासनाने दिरंगाई न करता त्वरित उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्याचबरोबर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी  शासनाने संगमनेरला एमआयडीसी स्थापन करावी. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) किल्ल्यावर जिजामाता यांचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या किल्ल्याच्या विकासासाठी निधीची मागणी केली. 

तसेच तामकडा रोपवे, सौंदर्यकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. राज्य शासनाकडून सध्या पाच कोटीचा आमदार निधी मिळतो. परंतु, एवढ्या कमी निधीमध्ये विकास कामे करणे अवघड असल्याचे सांगून आमदार निधी ५ कोटीं वरून १० कोटी रुपये करावा अशी मागणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सभागृहात केली.

संगमनेर मतदारसंघात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा व जलसंधारण विकास विभागाकडून अधिक निधी मिळावा. ग्रामीण रस्ते विकास तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ५० कि.मी. चे रस्ते वाढविण्यात यावे. ऊर्जा विभागातील महत्त्वाच्या योजना आरडी एसएस तसेच इतर योजनांसाठी निधी मिळावा. 

सध्या कोपरगाव येथे सहकार न्यायालय आहे. मात्र, सहकारी संस्थांच्या न्यायालयीन कामकाजासाठी कोपरगाव लांब पडत आहे. त्यामुळे  संगमनेर व अकोलेसाठी संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू करावे‌. सद्यस्थितीला संगमनेर शहरातील पोलीस वसाहतीची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे पोलिस कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी चांगली वसाहत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधत निधी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !