‘आमदार आपल्या गावात अभियान’ राबवणार - आमदार अमोल खताळ
◻️ डिग्रस येथील कार्यक्रमात केली घोषणा
संगमनेर LIVE | सर्व सामान्यासह गाव पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये लवकरच ‘आमदार आपल्या गावात’ हे अभियान सुरु करणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे एकलव्य जयंती व प्राथमिक शाळा खोली भूमीपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक हरि कोरडकर होते. मालुंजे माजी संरपच संदिप घुगे, डिग्रसचे संरपच अशोक खेमनर, उप संरपच रंगन्नाथ बिडगर, भाजपचे ज्येष्ठ नेते दादा गुंजाळ शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, खांबा गावचे सरपंच रवी दातीर, ॲड. संदिप जगनर, मच्छीद्र तांबडे, शहाजी बिडगर वामन बर्डे, अनिल खेमनर, मोठ्याभाऊ खेमनर, मच्छिद्र कोरडकर, साहेबराव नान्नर, गणपत बिडगर, खंडू बिडगर, मुरलीधर बर्डे, ग्रामसेविका श्रीमती रुपाली कहाणे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यात महायुतीचा आमदार नसताना सुद्धा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्याला सहाशे कोटी दिले होते. आता तर, संगमनेर विधानसभेचा आमदारच महायुतीचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जास्तीत जास्त निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. मुलभूत सुविधा सह साकूर पठारभाग, तळेगाव, निमोण या भागातील जनतेचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवून हा तालुका टँकर मुक्त करण्यासाठी आपला प्राधान्य क्रम राहील असे त्यांनी सांगितले.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरपच अशोकराव खेमनर यांनी केले. तर, आभार ज्ञानदेव श्रीराम यांनी मानले.
तुम्ही सर्वानी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ देत मला या आमदार केले. अशीच साथ आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पचायत समिती, नगरपालिकेसह साखर कारखाना या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत द्यावी. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी कामाला लागा. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी महायुतीच्या कार्यकर्त्याना केले.