रमजान ईद हा बंधूभाव व मानवतेचा संदेश देणारा सण - बाळासाहेब थोरात
शहरातील ईदगाह मैदानात रमजान ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा!
संगमनेर LIVE | भारतामध्ये विविध धर्म, पंथ, जात असूनही मानवता धर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व मानवधर्माचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, विश्वासराव मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास, किशोर कालडा, नितीन अभंग, जीवन पांचारिया, गजेंद्र अभंग, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शकील पेंटर, शफी तांबोळी, जावेद शेख, कन्हैया कागडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. उपवासाने जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये विविधता असून सर्व धर्म समभावामुळे सर्व नागरिक एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. आपल्या देशाची ताकद आहे.
रमजान ईद हा सण संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने मुस्लिम बांधव साजरा करत असून बंधू भावाचा प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण आहे. सर्वधर्मसमभाव व मानवताधर्म वाढल्याने देशाची खरी ताकद वाढणार असून प्रगती होणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान याप्रसंगी डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात यांनी देखील रमजान ईद सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.