घटस्फोट देण्यासाठी विवाहितेने मागितले १० लाख रुपये
◻️ दाढ खुर्द येथील विजय जोशी या तरुणाने केली आत्महत्या
◻️ पत्नीसह आणखी तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील विजय भास्कर जोशी या तरुणाने ६ मार्च २०२५ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महात्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याबाबत नुकताच आश्वी पोलीस ठाण्यात मयत तरुणांची पत्नी, सासरा, सासु व मेहुणा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत तरुणांची आई संगीता जोशी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा विजय भास्कर जोशी (वय - २८) यांचा विवाह खांबे येथील हरिभाऊ जोरी यांच्या मुलीबरोबर १९ जुन २०२२ रोजी त्यांच्या वस्तीवर झाला होता. लग्नानंतर सुन - मुलगा व आम्ही एकत्र राहत होतो. मुलगा विजय हा जागरण गोंधळात वाघ्या म्हणून काम करत असे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना जागरण गोंधळात वाघ्याचे काम करण्यावरून सुन व मुलात वाद सुरू झाले. त्यामुळे मुलगा विजय हा तणावात राहत असे.
दि. २ मे २०२४ रोजी मी, पती व मुलगा असे तिघे जण बहीणीच्या मुलींच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलो होतो. त्यावेळी माझी सून पूजा एकटीच घरी होती. लग्न झाल्यानंतर आम्ही घरी आलो. दि. ३ मे २०२४ रोजी मुलगा व पती घरी नसताना माझा भाऊ पांडुरंग जोरी हा घरी आला व आमची सुन व त्यांची मुलगी पूजा हिला आम्हा कोणाला काही न सांगता घेऊन गेला.
त्यानंतर मुलगा विजय याला सून पूजा हिने शिबलापुर येथे भेटायला बोलावले होते. यावेळी त्यांच्यात वाद होऊन सुनाने घटस्फोटाची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ३ जुन २०२४ रोजी मी नातेवाईकासमवेत खांबे येथे गेलो होतो. यावेळी सुन पुजा हिने नांदायला येण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयातून रितसर घटस्फोट घेण्याबाबत चर्चा झाली आणि सर्व संमतीने पूजाला उदरनिर्वासाठी २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे न्यायालयात घटस्फोट मिळण्याबाबत दावा दाखल करण्यात आला होता. केसची अंतिम तारीख ही २७ फेब्रुवारी २०२५ रोजी होती. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सून पूजा हिला २ लाख ५० हजार रुपये द्यायचे होते. मात्र त्या दिवशी पूजा ही न्यायालयात गैरहजर राहिली.
त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मुलगा विजय यांने, पूजा व तिचा भाऊ प्रसाद यांनी १० लाख रुपये दिले तरचं घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात येऊ असे म्हणाले होते. तसेच पैसे नाही दिले तर, तुम्हा सर्वाचा काटा काढू असा दम देखील दिला असल्याचे सांगितले. तेव्हापासून माझा मुलगा घाबरलेला होता. त्यानंतर दोन ते तीन वेळेस शिबलापुर येथे झालेल्या भेटीदरम्यान मुलगा विजय याला सुन, तिचा भाऊ, तिचे वडील व आई यांनी शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलगा विजय यांने ६ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घरी कोणी नसताना घराचतचं दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३५/२०२५ नुसार बीएनएस कलम १०८, ३५२, ३५१(२), (३) ३(५) प्रमाणे पत्नी पूजा जोशी, सासरे हरिभाऊ जोरी, सासू मंदा जोरी, मेव्हणा प्रसाद जोरी (सर्व रा. खांबे, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे व त्यांचे सहकारी करत आहेत.