डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेत सुयश
संगमनेर LIVE (नगर) | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्रातील पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर क्रीडा महाकुंभ २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू झाली असून, यात पारंपारिक तसेच जागतिक स्तरावरील खेळांचा समावेश आहे.
डॉ. विखे पाटील आयटीआय, एमआयडीसी अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २ व ३ मार्च रोजी संस्थास्तरीय फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ४ व ५ मार्च रोजी अहिल्यानगर येथील शासकीय आयटीआयमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
विद्यार्थ्यांचा दमदार विजय..
या स्पर्धेत पंजा लढविणे या खेळात सचिन प्रशांत जाधव, दत्तात्रय यशवंत कराळे, ओंकार संतोष देवकाते आणि सिद्धार्थ विनायक रोकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तर लगोरी या स्पर्धेत सोमनाथ जवळे, तेजस लकडे, अमन शर्मा, प्रथमेश बेरड, संतोष शिंदे, धनंजय डोंगरे आणि अतुल येवले यांनी प्रथम पारितोषिक मिळवत नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
संस्थेचे प्राचार्य ए. व्ही. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल पी. एम. गायकवाड, डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे आणि डायरेक्टर सुनील कल्हापुरे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.