महिलेचा शासन स्तरावर सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करणार - आमदार अमोल खताळ
◻️ बिबट्याच्या तावडीतून पतीची सुटका करणाऱ्या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
संगमनेर LIVE | एका धाडसी महिलेने आपल्या जीवाची परवा न करता बिबट्याशी तब्बल अर्धा तास झुंज देत बिबट्याच्या तावडीतून आपल्या पतीची सुटका करत प्राण वाचविले. त्या धाडसी महिलेचा जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्याच्या वतीने आमदार अमोल खताळ यांनी सन्मान केला. या धाडसी महिलेचा शासन स्तरावर देखील सन्मान व्हावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदू दुधवडे या मेंढपाळावरती दोन दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. त्यांच्यावरती कुटे रुग्णालयात उपचार सुरू आहे. आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी दुधावडे यांची भेट घेतली. बिबट्याशी झालेल्या झुंजीचा थरारक अनुभव नंदा दुधवडे आणि त्यांचे पती चंदू दुधवडे यांच्या तोंडून ऐकताना आमदार खताळ यांच्यासह सर्वाच्याच अंगावरती शाहारे उमटले होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नंदा दुधवडे या महिलेच्या धाडसाचे आमदार अमोल खताळ यांनी कौतुक करत त्या महिलेचा सन्मान केला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चंदू दुधवडे यांच्या दवाखान्याचा खर्च वनविभागाने तातडीने मंजूर करून त्यांना देण्यात यावा तसेच या बिबट्याच्या हल्ल्यात दुधवडे यांच्या २ मेंढ्या ठार तर ४ मेंढ्या जखमी झाल्या होत्या. त्याचाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावा अशी सूचना आमदार खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, रमेश काळे, डॉ. प्रदीप कुटे, चंदनापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहाणे, श्याम राहणे, वनरक्षक विक्रांत बुरांडे आदि उपस्थित होते.