‘कृषी छाया २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
◻️ विजेत्या संघांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालयात ‘कृषी छाया २०२५’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शानदार समारोप २९ मार्च २०२५ रोजी झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, बॅडमिंटन, गोळाफेक, कबड्डी आणि रस्सीखेच अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अॅड. वसंतराव कापरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनयकुमार आवटे (संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन, महाराष्ट्र राज्य), तसेच प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सचे संचालक डॉ. उत्तमराव कदम उपस्थित होते.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना विनयकुमार आवटे यांनी कृषी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे सांगितले. डॉ. उत्तमराव कदम यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले, तर अॅड. वसंतराव कापरे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाकौशल्यावरही लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपिका मावळे व डॉ. सुरेश खेडकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. डी. एम. नलावडे यांनी मानले.