गोगलगाव येथे दोन सख्ख्या चुलत भावाचा ओढ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
◻️ शेतात खत पांगविल्यानंतर शेजारील ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेले होते
◻️ १८ व १५ वयोगटातील दोघांच्या अकस्मात मृत्यूमुळे पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | शेतामध्ये खत पांगविल्यानंतर शेजारी असलेल्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने एकमेकांना वाचविण्याच्या नादात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी दुपारी राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली.
साहिल दत्तात्रय चौधरी (वय - १८) किरण नारायण चौधरी (वय - १५) दोघे रा. गोगलगाव, ता. राहाता असे मयत मुलांची नावे आहेत. मयत किरण चौधरी हा इयत्ता ९ वी पास झाला होता. तर, साहिल चौधरी हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. याबाबत खबर देणारे किसन तुकाराम तनपुरे यांच्या माहितीनुसार ते शेत पिकाला पाणी भरत असताना त्यांची शेजारी राहणारे मयत मुले हे शेतामध्ये खत पांगवत होते.
खत पांगविल्यानंतर ते दोघे जण शेजारी असलेल्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेले असता दोघांचे पाय घसरून ते पाण्यात पडले. त्यामुळे तेथील महिलांनी मोठ्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकून खबर देणार किसन तुकाराम तनपुरे हे तेथे पळत गेले. परंतु, तेथे पाणी जास्त असल्याने दोघांना पाण्यात बुडतांना पाहिले. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेत त्यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच दोघाना मयत घोषित केले.
सायंकाळी शोकाकुल वातावरणात दोघावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दरम्यान किसन तुकाराम तनपुरे यांनी दिलेल्या खबरीवरुन लोणी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.