उद्या संगमनेर येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे आयोजन
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीचा उपक्रम
◻️ येताना दिव्यांग बांधवांनी सोबत आणायची कागदपत्रे..
संगमनेर LIVE | आमदार अमोल खताळ यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी संगमनेर येथे उद्या शुक्रवार दि. ९ मे रोजी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आमदार अमोल खताळ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर विधानसभा मतदार संघातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरीता जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथील वैद्यकीय अधिकारी गोकुळ घोगरे, डॉ. महावीर कटारिया, डॉ. साजिद तांबोळी, एम. एस. जत्ती, राहुल फडके, मंगेश कवडे, सतीश अहिरे हे सर्व वैद्यकीय अधिकारी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यत दिव्यांग बंधू भगिनींची तपासणी केली जाणार आहे.
या शिबिरामध्ये अस्थी व्यंग, दृष्टीदोष व कर्णबधिरता, दिव्यांगात्वाची संबंधित तपासणी करून पात्र रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी नेत्र चिकित्सा, अस्थिव्यंग व कान, नाक, घसा या आरोग्य समस्या असणाऱ्या दिव्यांग बांधवांची प्रमाणपत्रासाठी लागणारी तपासणी होणार आहे. तरी या शिबिरासाठी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यानी केले आहे.
दिव्यांग बांधवांनी ही कागदपत्रे सोबत आणावी..
दिव्यांग बांधवांनी या शिबिराला येताना मूळ रेशनकार्ड, मूळ आधारकार्ड, दोन फोटो तसेच रेशनकार्ड आणि आधारकार्ड यांची झेरॉक्स घेऊनच उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे आधार कार्डशी जोडलेला मोबाईल देखील सोबत आणावा.