माजी मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाणी चिंचोलीत दाखल
◻️ गावात पाणी आल्यामुळे नागरिकांचा आनंद गगनात मावेना
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तळेगाव सह दुष्काळी भागातील जनतेला निळवंडेचे पाणी देण्यासाठी मोठे काम केले. कालव्यांमधून गावागावात पाणी देण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून यंत्रणा देऊन पाणी पोहोचवले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणाचे पाणी थेट चिंचोली गावात आल्याने नागरिकानी मोठा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरीकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
निळवंडे धरण हे तळेगावसह दुष्काळी भागाला वरदान ठरणारे आहे. हे धरण व कालवे पूर्ण करणे हा जीवनाचा ध्यास म्हणून माझी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरण व कालवे पूर्ण केले. मागील दोन वर्षांमध्ये दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी काम केले. संपूर्ण काम करून ठेवले होते मात्र, सत्ता बदलली. तरीही या जनतेला पाणी देण्यासाठी माजी मंत्री थोरात कटिबद्ध राहिले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा व पाईप देऊन विविध गावांसाठी मोठमोठ्या चाऱ्या निर्माण केल्या. यासाठी कारखान्याची यंत्रणा रात्रंदिवस काम करत होती. कर्मचारी जेसीबी पोकलँड यांसह कारखान्याने चर खोदून त्यामध्ये पाईप टाकून दिले आहे. या चर खोदणीमुळे मागील वर्षीपासून देव कवठे, मलढोण, सायाळे या गावांना पाणी मिळत आहे. इतर गावांनी ही मागणी केल्यानंतर कारखान्याचे यंत्रणांनी त्यांना मोठी मदत केली.
कालव्यापासून चिंचोली गुरव नदीपर्यंत चार किलोमीटरच्या अंतरा करता मोठी चारी खोदण्यात आली असून दोन बंधारे व तीन नद्या ओलांडून हे पाणी अखेर चिंचोली गावात दाखल झाले आहे. मागील काही वर्षांचे स्वप्न साकार झाल्याने संपूर्ण नागरिकांनी मोठ्या आनंदाने पाण्याचे स्वागत केले.
दरम्यान हे पाणी आणण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह कारखान्याच्या यंत्राने मोठी मदत केली असून नागरिकांनी लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निळवंडेचे पाणी आल्याने गावात आनंद..
निळवंडे धरणाचे पाणी गावात आल्याचे समजतात गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, बालक , शेतकरी व महिला यांनी पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेतून व कष्टातून आलेले पाणी गावात आल्यानंतर सर्वांनी या पाण्याचे दर्शन घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांना धन्यवाद दिले. यावेळी फटाके वाजवून व गुलाल उधळून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला.