महाराष्ट्राला लाज वाटेल अशा घटना बीडमध्ये घडतायत हे दुर्दैव
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान सरकारला सुनावले खडे बोल
◻️ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सोबत घडलेल्या घटनेवरून प्रशासनाला फटकारले
संगमनेर LIVE (नांदेड) | बीडमध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे प्रकार सुरू आहेत. अशा घटना घडू नये यासाठी सरकार नेमकं काय करत आहे? बीड मधील घटना या दुर्दैवाने महाराष्ट्राला लाज वाटाव्या अशा आहेत. अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना नांदेड येथे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, बीड मधील घटना या अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहेत. त्याचा संसर्ग इतर जिल्ह्यात जातो की काय? अशी चिंता असताना सरकार करते काय हा मोठा प्रश्न आहे. असेच होणार असेल तर राज्याचे आणि देशाचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश झाले. याचे सर्वत्र कौतुक आहे. महाराष्ट्र आनंदात आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे प्रथमतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे स्वागत करतो आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने चीफ सेक्रेटरी तेथे अनुपस्थित असणे अत्यंत हे दुर्दैवी होते.
याचबरोबर भाजप सध्या पाकिस्तान बरोबर झालेल्या शस्त्र संधी नंतर तिरंगा यात्रा काढत आहे. ते कशाचा आनंद व्यक्त करत आहेत. हे कळत नाही? फक्त त्यांनी तिरंगा शब्द मान्य केला याचा आनंद आहे.
काँग्रेसने कायम देशाचे सार्वभौमत्व व राज्यघटना जपण्यासाठी काम केले आहे. देश म्हणून संरक्षण किंवा परराष्ट्र धोरणाबाबत काँग्रेस कायम सरकारच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समविचारी पक्षांना बरोबर घेऊन एकत्र निर्णय घेऊन काम करू. असे ही महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी म्हटले.