लोकाग्रहास्तव बाळासाहेब थोरात यांनी स्विकारले कारखान्याचे चेअरमन पद

संगमनेर Live
0
लोकाग्रहास्तव बाळासाहेब थोरात यांनी स्विकारले कारखान्याचे चेअरमन पद

◻️ जेष्ठ संचालक पांडुरंग घुले यांची व्हा. चेअरमन पदी सर्वानुमते निवड

संगमनेर LIVE | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. यानंतर सभासद व जनतेच्या आग्रहास्तव कारखान्याच्या चेअरमनपदी बाळासाहेब थोरात यांची तर व्हा. चेअरमन पदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले यांची एकमताने निवड झाली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड झाली. चेअरमनपदी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना संपतराव गोडगे यांनी केली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिले. आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पांडुरंग दामोदर घुले यांच्या नावाची सूचना विजय राहणे यांनी केली. विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त, काटकसर, पारदर्शकता या आदर्श तत्त्वावर व विचारांवर संगमनेरचा सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे. सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने बिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मध्ये अनेक अडचणी आहेत. खाजगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक सीजन हा नवीन प्रश्न घेऊन येत असतो. कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असतात. यापुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे.

कारखाना निवडणुकीपूर्वी अनेक अफवा आल्या पण सभासद व जनतेने निवडणूक बिनविरोध केल्याने तो फुगा फुटला. संगमनेर तालुक्याने एक वेगळी राजकीय संस्कृती निर्माण केली आहे. येथे बंधू भावाचे वातावरण आहे. विरोधकांचाही कधी व्यक्तिदोष कोणी केला नाही. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली. सहकार हा निकोप व पारदर्शक पद्धतीने चालतो आहे. राज्यामध्ये विकसित व वैभवशाली असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होतो आहे. मात्र या चांगल्या राजकीय संस्कृतीची काळजी करावी लागणार आहे.

आता वातावरण बदलले आहे. तालुक्यात दहशत वाढते की काय असा प्रश्न आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा विचार करा. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने लढा. कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांना पहिली आपल्या तालुक्याची संस्कृती समजून सांगितली पाहिजे. असे सांगताना आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी जास्त काम करावे लागेल असेही ते म्हणाले.

डॉ. सुधीर तांबे आणि पांडुरंग घुले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सभासद व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी..

जनतेच्या आशीर्वादाने व नेतृत्वाच्या विश्वासाने राज्यभरात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या पदांचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आपण केला. विधानसभेच्या निवडणुकीत अपघात झाला. परंतु यापुढे सर्वानी एकजुटीने एकत्र येऊन काम करायचे आहे. पक्ष नेतृत्वाने कायम विश्वास टाकला असून राष्ट्रीय पातळीवरील सीडब्ल्यूसी च्या महत्त्वाच्या समितीमध्ये पहिल्या २१ जणांमध्ये आपला समावेश आहे. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील विविध जबाबदाऱ्यांसह सध्या गुजरातची जबाबदारी आहे. उद्या दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असून राज्य पातळीवरही महत्त्वाच्या बैठकांसाठी सातत्याने आग्रह असतो. हा सन्मान तालुक्याच्या जनतेचा असून सर्वांनी एकजुटीने काम करा असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !