संगमनेर खुर्दचा वीजपुरवठा खंडित ; टँकरच्या लागल्या रांगा
◻️आमदार अमोल खताळ यांचे निर्देशानंतर काही वेळातच वीज पुरवठा सुरळीत
◻️ पाण्याचे टँकर भरून टंचाईग्रस्त गावांना झाले मार्गस्थ
संगमनेर LIVE | वादळवाऱ्यामध्ये झाड विजवाहक तारां वर पडले होते. त्यामुळे संगमनेर खुर्द व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. म्हणून संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदी पुलावर पाण्याच्या टँकरची लांबच लांब रांग लागली होती. ही माहिती आ. अमोल खताळ यांना समजतात त्यांनी तात्काळ महावितरण च्या अधिकार्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत झाला अन उभे असलेले पाण्याचे टँकर भरून टंचाईग्रस्त गावांना मार्गस्थ झाले.
संगमनेर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवरून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून पाठवले जातात. सध्या सर्वत्र वादळवाऱ्यासह पाऊस चालू आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळ वार्यामुळे झाड उन्मळून विजवाहक तारांवर पडले होते. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरणने संगमनेर खुर्द परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता.
वीजपुरवठा खंडित असल्यामुळे संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवर पाण्याचे टँकर भरले गेले नाही. त्यामुळे संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीच्या छोट्या पुलावर टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही माहिती आमदार अमोल खताळ यांना समजली. मात्र, ते अहिल्यानगर येथे एका बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ बंधू राहुल खताळ यांना संगमनेर खुर्द येथे पाठवले होते.
खताळ यांनी संगमनेर खुर्दच्या शासकीय विहिरीवर जाऊन टँकर का उभे राहिले याची माहिती घेतली असता झाड पडले असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देत वीजपुरवठा सुरळीत करा आणि पाण्याची टँकर भरण्याची व्यवस्था करा असे सांगितले. त्यानंतर थोड्याचं वेळात वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर पाण्याचे टँकर भरून टंचाईग्रस्त गावाकडे मार्गस्थ झाले.