तळेगाव भागात निळवंडे धरणाचे पाणी आल्याने नागरिक सुखावले!
◻️ बाबा ओहळ यांच्या उपस्थितीत विविध गावांमध्ये जलपूजन
संगमनेर LIVE (तळेगाव दिघे) | दुष्काळी भागातील शेतकरी व नागरिकांना निळवंडे धरणाचे पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरण व कालवे पूर्ण केले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कालव्यांद्वारे विविध बंधाऱ्यांमध्ये पाणी आल्याने तळेगाव परिसरातील गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण झाली असून शेतकरी आनंदी झाला आहे. हे पाणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच आल्याचे गौरवोद्गार राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी काढले आहे.
तालुक्यातील वरझडी, लोहारे, कासारे, मिरपूर येथे निळवंडे च्या डाव्या कालव्यातून आलेल्या पाण्याने भरलेल्या बंधार्यांची पूजन करताना ओहळ बोलत होते. कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, बाबा ओहोळ, प्रभाकर कांदळकर, डॉ. संदीप गोर्ड, कारभारी गोर्डे, आप्पासाहेब गोर्डे, मुरलीधर वेताळ, बाबासाहेब गोर्डे, बाळासाहेब गोर्डे, काशिनाथ काळे, दत्तात्रय कार्ले, शिवाजी कार्ले, गणपत कार्ले, सोमनाथ कार्ले,वाल्मीक गायकवाड, विठ्ठलराव कार्ले, ज्ञानदेव शेळके आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबा ओहोळ म्हणाले की, १९९९ मध्ये खऱ्या अर्थाने निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रात्रंदिवस या कामासाठी पाठपुरावा केला. ‘आधी पुनर्वसन मग धरण’ मार्गी लावताना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतावरील पुनर्वसनाचा शेरा सुद्धा उठविला. याचबरोबर कोरोना संकटातही कालव्यांचे कामे सुरू ठेवून डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. ज्यांनी कामात योगदान दिले नाही ती मंडळी आता काही ठिकाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जनतेला माहित आहे काम कोणी केले आणि अडचणी कोणी निर्माण केल्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच तळेगाव भागात पाणी आले असल्याचे ते म्हणाले.
संपतराव गोडगे म्हणाले की, उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी आल्यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने शेतकऱ्यांना मोठी मदत केली. गावोगावची तळी भरण्याकरता चारी निर्माण केली. याचबरोबर दोन कोटीच्या पाईपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पाणी उचलले गेले. त्यामुळे तालुक्यामध्ये जलसमृद्धी वाढली आहे. पाणी देणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात असून आगामी काळात सर्वांनी त्यांच्याच पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
दरम्यान याप्रसंगी वरझडी, कासारे, लोहारे येथे युवकांनी मोठ्या आनंदोत्सवात पाणी पूजन केले