श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न
संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी येथे दिनांक ०६ जून २०२५ रोजी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणेत आले. त्या अनुषंगाने कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे संकल्पनेनुसार सदर कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये आयोजित केलेला होता.
सुरुवातीला संस्थेतील विविध प्रशिक्षणार्थ्यांमार्फत तयार करणेत आलेल्या मॉडेलची आकर्षक मांडणी करुन तंत्रज्ञानावर आधारीत मशिनरीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात सुरुवातीस, प्रतिमा पूजन झालेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनिषा वर्मा यांनी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांना दृकश्राव्य पध्दतीने संदेश दिला. सदर प्रसंगी कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभाग यांचे सुचनेनुसार आयटीआयमधील विद्यार्थ्यामध्ये चांगले विचार रुजविण्यासाठी ‘स्वदेशी विचारांचा प्रसार’ या विषयावर यशोदीप शेटे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणेत आले.
याप्रसंगी बोलतांना गोरक्ष गाडीलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार - विचारांचे अनुकरण केल्यास एक नवीन भारत देश निर्माण होईल असे मत मांडले. संस्थेतून शिक्षण घेऊन गेलेले तसेच सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी तयार केलेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान, मशिनरी यांचे प्रदर्शन व परिक्षण श्री साईबाबा संस्थानमध्ये करणेत येईल जेणेकरुन सदर तंत्रज्ञानाची दखल संस्थानकडून घेतली गेल्यामुळे अधिकाधिक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल असे म्हणाले.
या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य अभयकुमार दुनाखे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास पाटील यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमास संस्थानचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे, विश्वनाथ बजाज, गटनिदेशक दादा जांभूळकर आदीसह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.