सहकारमहर्षी क्रीडा संकुलात ४ हजार विद्यार्थ्याच्या उपस्थित ‘योग दिवस’ साजरा
◻️ प्रत्येकाने रोजच्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा - बाळासाहेब थोरात
◻️ योगामुळे शरीर लवचिक होत असल्याने नियमित योगासने करा - डॉ. सुधीर तांबे
संगमनेर LIVE | सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे असून योगामुळे शरीर लवचिक होते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करा. असे आवाहन डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तर भारताने जगाला योगाची देणगी दिल्याचे डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, सह्याद्री संस्थेचे रजिस्टार उमेश डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. नंदा वलवे, सह सेक्रेटरी आचार्य बाबुराव गवांदे, ॲड. सुहास आहेर, प्राचार्य के. जी. खेमनर, योगशिक्षक किशोर देशमुख, जालिंदर नाईक, भारत शिंदे, उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे, पर्यवेक्षक ज्ञानदेव पवार, सौ. संगीता रणशूर आदींसह सर्व शिक्षक व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या ३ हजार ५०० विद्यार्थी व एकवीरा आणि जय हिंद लोक चळवळी ५०० युवकांनी एकत्रित योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केला.
डॉ. तांबे म्हणाले की, माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा आरोग्याला जपा हा मंत्र दिला आहे. याचबरोबर स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या ही शिकवण दिली आहे. योग ही प्रत्येकाने जीवनशैली करावी. दररोज वीस मिनिटे तरी योग करा. योगासनामुळे शरीर लवचिक होत असून शरीरासाठी अत्यंत चांगला असलेला सूर्यनमस्कार हा प्रकार प्रत्येकाने जास्तीत जास्त करावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, योग ही भारताची जगाला देणगी असून योगामुळे शरीर चांगले राहते. योग दिनाच्या निमित्ताने फक्त एक दिवस योग न करता स्वतःसाठी दररोज प्रत्येकाने योग करा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कारण चांगले आरोग्य हीच तुमची मोठी संपत्ती आहे. मन आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा अत्यंत गरजेचे असून स्वस्थ रहा, मस्त रहा ,जबरदस्त रहा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व विद्यार्थ्यांना शिक्षण किशोर देशमुख यांनी दिले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य बाबुराव गवांदे यांनी केले सूत्रसंचालन डी. व्ही. गुंजाळ यांनी केले तर प्राचार्य के. जी. खेमनर यांनी आभार मानले.
यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते, महिला, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एकवीरा फाउंडेशन च्या वतीने पौष्टिक डिंक लाडूचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
प्रत्येकाने रोजच्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा - माजी मंत्री थोरात
योगामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मन शांत होते आणि संपूर्ण आरोग्य सदृढ राहते. नियमित योगाभ्यासामुळे स्नायूंची ताकद वाढते आणि मानसिक तणाव दूर होतो. त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या दिनचर्येमध्ये योगाचा समावेश करावा अशा शुभेच्छा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिल्या.