पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकार महर्षी थोरात यांच्या जीवनकार्याचा समावेश

संगमनेर Live
0

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहकार महर्षी थोरात यांच्या जीवनकार्याचा समावेश 

◻️ तिन्ही शाखाचे विद्यार्थी संगमनेरच्या सहकाराचा अभ्यास करणार

संगमनेर LIVE | संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श तत्व व विचार देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे सहकारातील योगदान, त्यांचे जीवन कार्य  आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील देशासाठी दिशादर्शक असलेल्या अमृत उद्योग समूहातील सहकाराचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच एम. कॉम. च्या अभ्यासक्रमात भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्याचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये संगमनेर येथील स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य व अमृत उद्योग समूहाचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण करणारा सहकार हा अत्यंत महत्त्वाचा असून या विषयाची विद्यार्थ्याना गोडी निर्माण व्हावी याकरता सहकार क्षेत्राचा विज्ञान व कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये मोठे काम उभे करणाऱ्या राज्यातील दिगज नेतृत्वाचा समावेश असून सहकारात आदर्श तत्व व विचार देणारे स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवन कार्याचा समावेश करण्यात आला आहे.

याचबरोबर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा व देशासाठी आदर्शवत असणारा संगमनेर येथील अमृत उद्योग समूहातील सहकार याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अमृत उद्योग समूहातील थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, अमृतवाहिनी शैक्षणिक संकुल याचबरोबर गावोगावी सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेली आर्थिक समृद्धी त्यातून साधलेला ग्रामीण विकास याचा समावेश आहे.

सहकारी पतसंस्था व दूध संस्था हा पॅटर्न संगमनेरचा राज्याला मार्गदर्शक असून यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता व समृद्धी निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी सहकार चळवळ मोडकळीस आली असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार मात्र देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. या सहकाराचा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याने ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यास सहकाराविषयी अधिक आवड निर्माण होणार आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्य, विधानपरिषद सदस्य, विद्याशाखा सदस्य, विविध अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य यांच्या विचारातून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे.

संगमनेरसाठी अभिमानास्पद..

राज्यातील सर्व सहकार चळवळ मोडकळीस आली असताना संगमनेरचा सहकार मात्र सर्वासाठी दिशादर्शक ठरला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारांमध्ये आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता, दूरदृष्टी, आधुनिकता ही तत्व रुजवली असून याच तत्वांवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह कार्यरत आहे. अभ्यासक्रमात या निकोप सहकाराचा समावेश झाल्याने राज्यातील सहकार क्षेत्र, अहिल्यानगर जिल्हा व सर्व संगमनेर करांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !