जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान! ही आपली सामूहिक जबाबदारी - आमदार खताळ
◻️ कारगिल दिनानिमित्त तळेगावाला ध्वजारोहण आणि वृक्षारोपण कार्यक्रम
संगमनेर LIVE | भारतीय सैन्य दलातील जवान आपल्या जीवाची पर्वा न करता, ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या कुटुंबापासून दूर राहून या देशाचे रक्षण करत आहेत. या जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे ही आपली सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे. असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
तालुक्यातील तळेगाव दिघे येथे कारगिल दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात खताळ बोलत होते. यावेळी त्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच माजी सैनिक व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून वृक्षारोपण केले.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, आपण सुरक्षितपणे आपले जीवन जगत आहोत, त्यामागे या जवानांचे अमूल्य योगदान आहे. मात्र काही गावांत दुर्दैवाने जवानांच्या कुटुंबीयांना समाजाकडून त्रास दिला जातो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आजच्या कारगिल विजय दिनी प्रत्येकाने भारतीय जवानांची सेवा ही केवळ सिमेपुरती मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबाचा आदर राखणेही आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
तळेगाव दिघे येथील बिरोबा महाराजांच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी आमदार खताळ यांनी दर्शन घेतले. त्यानंतर बिरोबा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.