तळेगाव आणि निमोण परिसराला भोजापुर धरणाचे पाणी देणार - आ. अमोल खताळ
◻️ भोजापुर धरणाचे जलपूजन आणि पूरचारीची ग्रामस्थांसमवेत केली पाहणी
संगमनेर LIVE | भोजापूर पुरचारी परिसरातील गावांना जाणून बुजून पाण्यापासून वंचित ठेवले गेले. निवडणूका जवळ आल्या की फक्त टँकरने चारीमध्ये पाणी आणून टाकले जात होते. मात्र, आता या भोजापुर चारीत टँकरने पाणी न टाकता तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी दिले जाईल. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव या दुष्काळी भागातील गावांना वरदान ठरणारे भोजापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाच्या पाण्याचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी थेट धरणापासून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील पूरचारी वरती अवलंबून असणाऱ्या पळसखेडे, निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, सोनोशी, वाटमाई देवी व गीते वस्ती या भागातील पूरचारीची पाहणी केली. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिकारी, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, भोजापुर धरणावर जाऊन जलपूजन करून तिगाव माथ्यापर्यंत पाणी यापूर्वी पोहोचावे असे साकडे घातले आहे. जलसंपदा खाते मंत्री विखे पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे आता तुम्हाला पाण्यासाठी वन वन फिरावे लागणार नाही. या पूरचारीसाठी मंत्री विखे पाटील यांच्याकडून २० कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे.
निमोण व तळेगाव, या दुष्काळी भागातील गावांना हक्काचे पाणी मिळवून देण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि माझे ध्येय आहे. येथून मागे फक्त चारीमध्ये टँकर ओतून पाणी आल्याचे भासविले गेले. माझ्या निमोण तळेगाव या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर तीगाव माथ्यापर्यंत या पुरचारीचे पाणी कसे पोहोचेल यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण करून कॉंक्रिटी करण्याचे महायुती सरकारचे धोरण आहे. निमोणच्या जगदंबा माता मंदिराच्या विकासासाठीचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. जिल्हा नियोजन च्या बैठकीत या मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. असे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.
तालुक्यातील निमोण गावातील २६ बंधाऱ्यांच्या खोलीकरणाचे काम आमदार खताळ यांच्या माध्यमातून मंजूर झाले. त्यातील २० ते २२ बंधाऱ्यांचे खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्या बंधार्यांमध्ये आमदार खताळ यांच्यामुळेचं भोजापूर पूरचारीचे पाणी आले. त्यामुळे आता निमोणकरांनी पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. अशा भावना निमोणचे सरपंच संदीप देशमुख व्यक्त केल्या.