◻️ शेतकऱ्यांचा आरडाओरडा ऐकून सुध्दा बिबट्या जागचा हालेना?
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे बुधवारी (१६ जुलै) दुपारी शेतकऱ्यासमवेत शेतात आलेल्या कुत्र्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांची भिंतींनी गाळण झाली होती. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकानी केली आहे.
उंबरी बाळापूर शिवारातील लेंडी पुलाजवळ असलेल्या दत्तनगर येथील गट नबंर ४७६ मध्ये संदीप होडगर या तरुण पशुपालकाचा गोठा आणि कुक्कुटपालन शेड आहे. मागील महिन्यात ६ जून रोजी पहाटे १५ ते १६ लहान मोठ्या मेंढ्या सह १५ ते २० कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. तर, यांच ठिकाणाहून काही हजार फूटाच्या अंतरावर मंगळवार दि. १७ जून रोजी मच्छिंद्र दगडू कालेकर हे जनावरांसाठी चारा कढत असताना सकाळी ९ वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र, कुटुंबातील व्यक्ती जवळ असल्याने पुढील अनर्थ टळला होता. त्यामुळे या परिसरात वनविभागाने तात्काळ पिंजरे लावत दोन बिबट्ये देखील जेरबंद केले होते.
तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटण्याच्या आतचं, म्हणजे आज बुधवारी (१६ जुलै) यांच परिसरात संदीप होडगर यांचे कुटुंबीय दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतातील मकाची खुरपणी करत होते. यावेळी त्यांचे पाळीव कुत्रे देखील त्याठिकाणी होते. यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यासमोरचं कुत्र्यांवर प्राणघातक हल्ला केला.
खुरपणी करत असलेल्या होडगर कुटुंबातील सदस्यांची विशेषतः महिलांची भितीने धांदल उडाली. तरी ही, महिला आणि पुरुषांनी मोठ - मोठ्याने आरडा - ओरडा केल्यामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडून दिले. एवढा गोंगाट होऊन देखील बिबट्या काही काळ जागेवरचं उभा होता. भर दिवसा लोकांसमोर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यात कुत्रा मात्र, गंभीर जखमी झाला असून गळ्याभोवती लोखंडी पत्र्याचा पट्टा असल्यामुळे तुर्तास तरी, त्यांचे प्राण वाचले आहे.
दरम्यान वारंवार यांच परिसरात बिबट्यांचे हल्ले होत असल्याने वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला आहे. मात्र, निर्ढावलेले हे बिबट्ये पिंजऱ्यात अडकण्याऐवजी त्याला चक्कर मारुन जात आहेत. त्यामुळे वनविभागाने आता दुसरा काहीतरी उपाय करत हे बिबट्ये जेरबंद करावेत आणि नागरीकांची दहशतीतून मुक्तता करावी. अशी मागणी सुरेश होडगर, संदीप होडगर, सोमनाथ शिंदे, सचिन शिंदे, बापू शिंदे, नानासाहेब होडगर आदि स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.