◻️ डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्यासह ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती
संगमनेर LIVE | भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रवरा, आढळा व म्हाळुंकी नद्या दूथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह शहरवासीयांनी प्रवरेच्या या पहिल्या पाण्याचे उत्साहात गंगामाई घाटावर पूजन आणि आरती केली.
यावेळी डॉ. मैथिली तांबे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, ॲड. अजित काकडे, सौ. प्रमिला अभंग, ॲड. मुन्ना कडलग, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, सुमित पवार, आदित्य बर्गे, चंद्रकांत काळन, एकनाथ श्रीपत, सौ. प्रीती फटांगरे, मिलिंद आवटी, सौ. सुषमा भालेराव, सौ. सुनीता कांदळकर आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला अत्यंत पवित्र स्थान आहे. नदीला आई म्हटलेले आहे. यावर्षी सुरुवातीलाच पाऊस चांगला झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. भंडारदरा धरणाबरोबर प्रवरा नदीवर निळवंडे येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या प्रयत्नातून निळवंडे धरण पूर्ण केले.
दोन्ही बाजूला कालवे निर्माण केले. नदीतून आणि कालव्यातून पाणी येत असल्याने आता समृद्धी वाढली आहे. निळवंडे व भंडारदरा मिळून आता २० टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. या पाण्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाला आहे. नदी सर्वांना सामावून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करते. संगमनेरला शहरातील नागरिकांसाठी प्रवरा नदीतील दुथडी भरलेले पाणी पाहणे हा अत्यंत आनंददायी क्षण असल्याचे ते म्हणाले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, रतनवाडी येथील अमृतेश्वर पासून उगम पावणारी आपली प्रवरा नदी ही पुढे मोठी होत जाऊन समुद्राला मिळते. पाच नद्यांच्या संगमामुळे संगमनेर शहराला संगमनेर हे नाव मिळाले आहे. संगमनेरची एक सुसंस्कृत संस्कृती आहे. या संस्कृतीचा आपल्या सर्वाना अभिमान आहे. प्रत्येक विभागाची संस्कृती घेऊन प्रवरा नदी समुद्राशी एकरूप होते. संगमनेरची ही संस्कृती एकतेची समानतेची आहे. आई म्हणून नदीची ओळख असून मोठ्या आनंदाने दरवर्षी आपण तिचे पूजन करत असतो. आजचा हा क्षण संगमनेरातील नागरिकांसाठी मोठा आनंदाचे असल्याचे त्या म्हणाल्या.