प्रवरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाचा मुद्दा थेट विधानसभेत!
◻️ आमदार अमोल खताळ यांनी लक्षवेधी मांडत राज्यातील जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची केली मागणी
संगमनेर LIVE | पुणे - नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटिश कालीन पूल आजही वापरात आहे. या पुलासह राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली. तर, तालुक्यातील रखडलेल्या कामाबाबतही शासनाचे त्यांनी लक्ष वेधले.
मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार खताळ यांनी हा प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून किती दिवसांमध्ये पुनर्बाधणी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारी रस्त्याची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. शासननिधी खर्च करायला तयार आहे. तरीही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, ही बाब लक्षात घेता वेळेमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी लक्षवेधी सूचना देखील आमदार अमोल खताळ यांनी मांडली.
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन ते चार पर्यटकांचा बळी गेला तर काही जण जखमी झाले. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. तसेच या प्रकरणाची चौकशी झाली नाही. याकडे आ. खताळ यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या दुर्घटनेबाबत एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या प्रकरणात जे कोणी दोषी आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे विधानभवनात सांगितले.