मेंढवन येथील वीज उप केंद्राचे काम तातडीने सुरू करावे - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
मेंढवन येथील वीज उप केंद्राचे काम तातडीने सुरू करावे - आमदार अमोल खताळ 

◻️ आमदार खताळ यांनी विधानसभेत तालुक्यातील विविध मागण्या मांडल्या 

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे १३२ केव्ही वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळ अधिवेशना दरम्यान केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली.‌ तालुक्यातील मेंढवन आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने स्वतंत्र १३२ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारणीसाठी नियोजन आराखड्यामध्ये बदल करून सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट केलेले आहे. वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे या भागातील जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या भागातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही, उद्योग आणि घरगुती वापरासाठी वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या परिसरात  विजेचे उपकेंद्र लवकरात लवकर करावे, असे आमदार खताळ म्हणाले.

गोवंश हत्या करणाऱ्यांवर  एमपीडीए किंवा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी,  पशुपालकांसाठी घरपोच पशुवैद्यकीय सेवा हवी, मराठी भाषा ही अभिजात भाषा असून राज्यात तिलाच प्राधान्य द्यावे, लोककला प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, ज्या भागात गोवंश कत्तलीचे प्रकार जास्त प्रमाणात चालू आहे, तेथील पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. अशा विविध मागण्या देखील यावेळी सरकार दरबारी त्यांनी केल्या.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास संदर्भात झालेल्या चर्चेत राज्यातील पशु पालकांच्या घरपोच सेवा सुलभ करण्याबाबत सरकारकडे मागणी करून आजारी जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्याऐवजी घरपोच सेवा देणं ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटीचे दर शासनाने ठरवून दिले आहेत, परंतु त्याचे डिजिटल ट्रॅकिंग गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने एक मोबाईल ॲप तयार करावे, ज्या माध्यमातून डॉक्टर व पशुपालकांचा संपर्क होईल. तसेच या दवाखान्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनं दिली तर, खर्चही कमी होईल, असे देखील आमदार खताळ यावेळी म्हणाले.

लोककला जीवंत ठेवणारे कलाकार पवळा भालेराव, अनंत फंदी, विठ्ठल उमप, कांताबाई सातारकर, गुलाबबाई संगमनेरकर यांचे स्मारक उभारावे आणि त्यांच्या नावाने लोककला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आग्रह आमदार खताळ यांनी सरकारकडे धरला आहे.

संगमनेर शहरातील शहर पोलीस ठाणे हे तहसील कार्यालयाच्या आवारात असल्यामुळे अडचणीचे ठरत आहे. तसेच ज्यांच्या वर संगमनेर शहराच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्या पोलीस वसाहतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने शहर पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र इमारत आणि पोलीस वसाहतीची उभारणी करावी. अशा मागण्या देखील केल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !