सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राच्या नावलौकिकाचे श्रेय पद्मश्रीना - भगवानराव इलग
◻️ प्रतापपूर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती साजरी
संगमनेर LIVE (आश्वी) | १८९७ साली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा लोणी बुद्रुक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. परंतु, आपल्या कार्यकर्तुत्वाच्या बळावर त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी विकासाच्या सुवर्ण युगाचा प्रारंभ झाला.
त्यांनी परिसरातील गोरं गरीब जनतेसाठी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ची स्थापना करुन आरोग्याचा प्रश्न सोडवला. तर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची दारे सर्वासाठी खुली करत शिक्षणाची क्रांती केली. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणि अर्थकारणाला चालणा मिळाली. असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते भगवानराव इलग यांनी काढले.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती तथा शेतकरी दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथे आयोजित कार्यक्रमात इलग बोलत होते. याआधी पद्मश्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेचे संचालक शिवाजीराव इलग, रंगनाथ आंधळे, बाळकृष्ण सांगळे, गजानन आव्हाड, पांडुरंग आंधळे, अजय आंधळे, संतोष इलग, एकनाथ सांगळे यांच्यासह जनसेवा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
भगवानराव इलग पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे. त्याचे खरे श्रेय पद्मश्रीनाचं द्यावे लागेल. त्यांच्या दूर दृष्टीकोनातून दूध संघ, सहकारी बँका, को- ऑपरेटिव्ह सोसायटी, शेती संस्था अशा प्रकारच्या शेंकडों संस्था निर्माण झाल्या. तसेच जिल्ह्यात आणखी सहकारी कारखाने उभे करण्यात देखील महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावल्याचे सांगून, पद्मश्रीच्या जयंतीचे हे १२५ वे वर्ष असून युनेस्कोने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ साजरे करण्याचा निर्णय घेतला, ही आपल्या सर्वासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हणतांच टाळ्यांचा कडकडाट झाला.