तरुणांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा - आमदार अमोल खताळ
◻️ क्रांती दिनानिमित्त नेहरू चौकातील अशोक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले
संगमनेर LIVE | भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक महापुरुषांनी त्याग, निष्ठा व बलिदान देत हुतात्म्य स्वीकारले आहे. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी तरुण पिढीने महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर शहरातील नेहरू चौक येथे क्रांती दिनानिमित्त आमदार खताळ यांनी अशोक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले, ९ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनामुळे संपूर्ण देशात हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांचा सल्ला न घेता भारताला युद्धात लोटले. स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मुंबईतील गवालिया टँक मैदानावरून 'करो या मरो'चा नारा दिला.
या आंदोलनात शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, महिला अशा सर्वच घटकांचा सहभाग होता. ब्रिटिशांनी गांधीजींसह अनेक नेत्यांना अटक केली; अनेकांनी बलिदान दिले. हा लढा स्वातंत्र्य संग्रामाचा निर्णायक टप्पा ठरला आणि त्याग व बलिदानातूनच १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.