आदिवासीं बांधवांच्या बळकविलेल्या जमिनी परत मिळवून देणार!
◻️ आमदार अमोल खताळ यांची जागतिक आदिवासी दिनी ग्वाही
◻️आदिवासी तरुणांनी काढलेल्या मोटार सायकल रॅलीचे केले स्वागत
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील अनेक गावातील आदिवासी बांधवांच्या जमिनी लाटण्याचे काम झालेले आहे. लाटलेल्या जमिनी तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि जमीन लाटणाऱ्यांचा बंदोबस्त करू. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी आदिवासी बांधवांना दिली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व आदिवासी बांधवांच्या रॅलीचे आमदार खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या समोर स्वागत करत आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.
आमदार खताळ म्हणाले की, जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलोय. हा दिवस एक सण म्हणून न बघता एक आपली आदिवासी बांधवांची ओळख तयार झाली आहे. देशाच्या विविध काना-कोपऱ्यात आदिवासी बांधव वास्तव्य करत आहे. मेहनती समाज म्हणून आपण आदिवासी बांधवांकडे बघत असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचे काम करत आहे. पूर्वीच्या काळी आदिवासी बांधवांचा केवळ मतासाठी वापर केला गेला. तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला या तालुक्यातील समाज बांधवांची सेवा करण्याची संधी दिली.
आपण संगमनेर मध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करत आहोत. यामुळे प्रत्येक समाजाच्या महापुरुषाच्या जयंती उत्सव साजरे होऊ लागले. सर्व महापुरुषांचा सन्मान करण्याचे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. आदिवासी समाजाचे अनेक नेते आपल्या हक्कासाठी आपल्या बांधवांच्या आपल्यासाठी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिले. त्यांचा संघर्ष सुद्धा आपण बघितला आहे. आदिवासी बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, उद्योग, संस्कृतीचा जतन करण्याचे कर्तव्य हे संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे आहे.
त्यामुळे यापुढील कालावधीत आपल्या शासनाच्या केंद्राच्या आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. येणाऱ्या कालावधी मध्ये आदिवासी समाजातील मुलामुलींना सुद्धा उच्च शिक्षण मिळाले पाहिजे. या समाजातून डॉक्टर, इंजिनिअर पुढे आले पाहिजे. समाजाच्या प्रत्येक गोष्टीचा उन्नतीसाठी विकासासाठी सर्व समाज बांधवांसोबत आपण उभे राहण्याची ग्वाही दिली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या एका महिलेला देशाच्या उच्च पदावर राष्ट्रपती पदी विराजमान करून आदिवासी समाजाचा मानसन्मान केला असल्याचेही आमदार खताळ यांनी म्हटले.