वडगाव लांडगा येथील भोजनगृहासाठी १० लाख रुपये निधी देणार!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात घोषणा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा गावात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपानंतर आता भोजनगृहाची गरज भासू लागली आहे. ही गरज ओळखून आमदार अमोल खताळ यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
तालुक्यातील वडगाव लांडगा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला आमदार अमोल खताळ यांनी भेट देऊन उपस्थित भाविकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सभामंडप उभारले आहे, मात्र सप्ताहाच्या काळात जेवणाच्या व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले भोजनगृह अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी या हॉलसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देणार आहे. सर्वानी एकत्र येऊन लवकरात लवकर काम सुरू करा आणि पुढील वर्षीच्या सप्ताहात या सभागृहात भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करा.”
ते पुढे म्हणाले की, “जग माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने पुढे जात असतानाच, आपला वारकरी संप्रदाय सुद्धा तितक्याच वेगाने विस्तारत आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक एकोपा व सलोखा वाढत असल्याचे पाहून मनाला समाधान वाटते.”
यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आमदार खताळ यांनी समाधान महाराज सुकनेकर यांचा विशेष सन्मान केला. दरम्यान याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत: यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.