डॉ. विखे पाटील महाविद्यालयात ‘अवयव प्रत्यारोपण दिवस’ उत्साहात साजरा
संगमनेर LIVE (नगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभाग, सर्जरी विभाग व हॉस्पिटलच्या वतीने अवयव प्रत्यारोपण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश अवयवदानाबाबत जनजागृती करणे, तरुण व वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे तसेच प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डॉक्टरांची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करणे हा होता.
या प्रसंगी “अवयव प्रत्यारोपण - देशाची गरज” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कॉलेजचे डेप्युटी डीन प्रो. डॉ. विजय पाटील यांनी अवयव प्रत्यारोपणातील आव्हाने, वैद्यकीय प्रगती व सर्जनची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर पवार यांनी स्वागत केले. ते म्हणाले, “अवयव प्रत्यारोपण देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात संशोधन व सेवा भावाने कार्य करणे गरजेचे आहे.”
सर्जरी विभागाचे प्रा. डॉ. भूषण शाह यांनी “अंगदान - जीवन संजीवनी” अभियानाचा आढावा घेत, हॉस्पिटलच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे अंगदान चळवळीस गती मिळाली आहे.”
हॉस्पिटलचे अवयवदान समन्वयक राज गिर्हे यांनी भारत सरकारच्या एनओटीटीओ व एसओटीटीओ यंत्रणेची माहिती देत नोंदणी प्रक्रिया व जनसहभागाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की, “हॉस्पिटलमध्ये अनेक यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या असून, त्यातून रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.”
संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी संचालक डॉ. अभिजित दिवटे, संचालक डॉ. अरुण त्यागी, डीन डॉ. सुनील म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश देशपांडे, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. जयंत गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रो. डॉ. एस. डी. जाधव, डॉ. मराठे, डॉ. डीपीन, डॉ. राकेश, रोहित यांचे विशेष योगदान राहिले.