“आश्वी पोलीस ठाण्यातून पीएसआय बोलतोय” तोतया घालतोय गंडा!
◻️ आश्वीसह पंचक्रोशीतील अनेक नागरीकाची अर्थिक फसवणूक झाल्यामुळे खळबळ
संगमनेर LIVE (आश्वी) | “आश्वी पोलीस ठाण्यातून पीएसआय राऊत बोलतोय” असे सांगून बॅकेचा हप्ता असल्याची बतावणी करुन क्यूआरकोडच्या माध्यमातून बॅक खात्यात पैसै पाठवण्यास सांगून नागरीकाची एक तोतया पोलीस फसवणूक करत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या भामट्याला जेरबंद करण्याचे मोठे आवाहन आश्वी पोलीसासमोर उभे ठाकले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आश्वी बुद्रुक येथील प्रतिष्ठित व्यावसायिकाला मंगळवारी (५ ऑगस्ट) रोजी एक फोन आला. “आश्वी पोलीस ठाण्यातून पीएसआय राऊत बोलतोय. ईएमआय आहे, २ हजार ४०० रुपये ऑनलाइन पाठवा” तसेच संशय येऊ नये म्हणून त्यांने पैसै पाठवण्याच्या चार्जेस बाबत देखील चौकशी केली. यानंतर व्यावसायिकाच्या व्हॉट्सॲप क्रमाकांवर पैसे पाठवण्यासाठी एका महिलेच्या नावाचा क्यूआर या भामट्याने पाठवला.
मात्र, व्यावसायिक चालाख असल्यामुळे त्याने पैसे पाठवण्याआधी आश्वी पोलीस ठाण्यात राऊत पीएसआय आहे का? याबाबत खात्री केली. यावेळी अशा नावाची कुणीही व्यक्ती येथे कार्यरत नसल्याची माहिती मिळाली. या व्यावसायिकांने यावेळी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्याची आर्थिक फसवणूक टळली आहे. तर, या सायबर भामट्याची बोलण्याची शैली हुबेहूब एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासारखीच असल्यामुळे परिसरातील अनेक नागरीकांना अशाचं पध्दतीने गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सायबर भामट्यानी आता आपला मोर्चा हा मागील काही काळापासून ग्रामीण भागात वळवला असून नानाविध कल्पना राबवुन हे भामटे नागरिकांची विविध प्रकारे फसवणूक करत आहेत. यापूर्वी देखील आश्वी परिसरातील नागरीकाकडून पोलीस असल्याची बतावणी करत पैसे उकळल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका ग्राहक सेवा केंद्र चालकाची सुमारे १८ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या दोन्ही घटनेत महिलांचे नावे असलेले क्यूआरकोड वापरण्यात आले आहे. तर, आश्वी खुर्द येथे देखील पोलीस असल्याची बतावणी करत एका व्यक्तीची अंगझडतीच्या बहाण्याने पैसे आणि सोन्याची अंगठी लाबवली होती.
दरम्यान दिवसेंदिवस तोतया पोलीसांकडून नागरीकाची फसवणूक होत असल्याने नागरीकांनमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ त्याला जेरबंद करत कठोर शासन करावे, अशी मागणी होत आहे.