म्हाळुंगी नदीवरील पुलाचे ‘स्व. खा. बाळासाहेब विखे पाटील साईसेतू’ नामकरण
◻️ आमदार अमोल खताळ याच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्याच्या मागणीला यश!
संगमनेर LIVE | म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलास स्व. खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील साईसेतू असे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय संगमनेर नगरपालिकेने घेतला आहे. शहरातील नागरीक आणि कार्यकर्त्यानी केलेल्या मागणीचा विचार करुन, आमदार अमोल खताळ यांनीही याबाबतचा पाठपुरावा केला होता.
म्हाळुंगी नदीवर पुलाच्या बांधकामासाठी खासदार निधीतून डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करुन दिली होती. पुलाच्या कामाचे भूमीपुजनही त्यांच्या उपस्थितीत झाले होते. मध्यंतरीच्या काळात म्हाळुंगी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे या पुलाचे बांधकाम खचले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने या पुलाच्या कामास निधी उपलब्ध झाला होता.
नागरीकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा पुल रहदारीसाठी सुरु करुन द्यावा, अशा सुचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी औपचारिक उद्घाटन करुन, या पुलाचे लोकार्पण झाला होते. मात्र तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या पुलास बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव द्यावे. अशी मागणी करणारे निवेदन नगरपालिकेस सादर केले होते. आमदार अमोल खताळ यांचाही यासाठी पाठपुरावा झाला.
संगमनेर नगरपरिषदेने ६ ऑगस्ट २०२५ रोजी म्हाळुंगी नदीवरील पुलास स्व. खा. बाळासाहेब विखे पाटील साईसेतू असे नामकरण करण्याचा ठरावा मंजुर केला असल्याची माहीती प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.