सफाई कामगारांच्या मागण्या ८ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा ठेकेदार बदला!

संगमनेर Live
0
सफाई कामगारांच्या मागण्या ८ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा ठेकेदार बदला!
◻️ आमदार अमोल खताळ यांचे संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याना निर्देश



संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आठ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा सद्य:स्थितीत कार्यरत असणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराला एकदा समज द्या. जर तो सुधारत नसेल तर, त्याचा ठेका रद्द करा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार नेमा. असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले.

संगमनेर नगरपरिषदेतील सर्व सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. ही बाब आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी तात्काळ शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे व उपशहरप्रमुख अजित जाधव यांना नगरपालिकेमध्ये पाठवून कामगारांच्या मागण्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर या दोघांनी सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून तुम्ही कामबंद आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व सफाई कामगारांनी आपले बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेतले.

शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी सफाई कामगारांच्या मागण्या आमदार अमोल खताळ यांच्या समोर वाचून दाखविल्या. त्यानंतर आमदार खताळ यांनी मुख्याधिकारी कोकरे यांच्याशी  चर्चा करत, आठ दिवसांमध्ये मागण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सर्व सफाई कामगारांचे जुलै महिन्याचा पगार आज  सायंकाळपर्यंत ऑनलाईन जमा केले जाईल. तसेच  महिन्यात चार पगारी सुट्ट्या देण्याचे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले.

तुमच्या पाठीशी मी भक्कम उभा..

राज्यातील महायुती सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे शासन स्तरावरील तुमच्या मागण्यांसाठी मी प्रयत्न करीन. शहराची स्वच्छता राखणे ही तुमची सर्वाची जबाबदारी आहे, म्हणून यापुढे काम बंद आंदोलन करू नका. तुमच्या समस्या असल्यास त्या मुख्याधिकाऱ्यांना सांगा. त्यांनी ऐकले नाही, तर माझे संपर्क कार्यालय तुमच्यासाठी कायम खुले आहे. मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !