पालकमंत्री विखे पाटील यांचे प्रशासनला सतर्कतेचे आदेश!
◻️ २२७ नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश, २४ मंडळात मुसळधार पाऊस
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | रविवारी सांयकाळपासून जिल्ह्यातील सहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परीस्थितीत नागरीकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आल्या असून, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे २२७ नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी, केडगाव भिंगार चिंचोडी चास श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण कोळेगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा नान्नज नायगाव साकत, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव चापडगाव मंगी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी माणिकदौंडी टाकळी कोरडगाव करंजी तिसगाव खरवंडी अकोला आशा २४ महसूल मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व नद्या ओढे नाले यांना पाणी येवून पूरग्रस्त परीस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, जीवित हानी कुठेही होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून सर्व परीस्थिती जाणून घेतली आहे. प्रशासनाने अडकलेल्या नागरीकांच्या स्थलांतरास प्राधान्य दिले आहे.
जामखेड पाथर्डी सोलापूर मार्गावरील कुशल ट्रव्हल कंपनीच्या बस मधील ७० प्रवाशांची सुटका अहिल्यानगर महापालिका आणि जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने केली. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारातील पुरात अडकलेल्या ३ आणि पिंपळेगव्हाण मधील एका व्यक्तीला तसेच खरमाटवाडी मधील २५ कोरडगाव मधील ४५ कोळसांगवी मधील १२ व्यक्तिंची सुटका करण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील खैरी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटंबातील ४ आणि वंजारवाडी येथे खैरी नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने ३० व्यक्तीची सुटका महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील १२ आखेगाव येथील २५ लोकांची सुटका करण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरीकांना यश आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले
पावसाची अधिकची शक्यता लक्षात घेवून पुणे येथून एनडीआरएफ पथक बोलावून बचाव कार्य सुरू करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून उपाय योजना कराव्यात. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरीकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मदतीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला असलेल्या स्थायी आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. झालेल्या नूकसानीची अद्याप स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत.
श्री क्षेत्र मोहटा देवी मंदीराकडे जाणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले असून प्रशासनाला याभागात काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी सूचनांचे पालन करावे.