दाढ खुर्द शिवारातील वाडगे मळ्यात 'बिबट्यांचा बछडा' जेरबंद!
◻️ परिसरात बिबट्याची दहशत कायम, नागरिकांची अधिक उपयोजनांची मागणी
◻️ नागरिकांसह लहान मुलांना अत्यावश्यक काळजी घेण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे भीती निर्माण झाली आहे. येथील वाडगे मळ्यात शुक्रवारी सायंकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा जेरबंद झाला आहे. मात्र, परिसरात मादी बिबट्या आणि इतर बछडे किंवा बिबट्ये असल्याने ग्रामस्थांनी अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून दाढ खुर्द शिवारातील वाडगे मळ्यात मादी बिबट्या आणि तिच्या बछड्यांचा धोकादायक वावर वाढला होता. या बिबट्यांनी आठ दिवसांपूर्वी कारभारी गोपीनाथ जोशी यांच्या वस्तीवरील गोठ्यात घुसून वासराची शिकार करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली होती.
यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार, वनविभागाने बाबासाहेब वाडगे यांच्या गट नंबर २०७ मध्ये पिंजरा लावला होता. शुक्रवारी रात्री पाऊने नऊ वाजण्याच्या सुमारास, याच पिंजऱ्यात मादी बिबट्याऐवजी तिचा अंदाजे सहा महिने वय असलेला एक बछडा अडकला. त्यामुळे या बछड्याला रात्री १० वाजेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे.
जरी एक बछडा जेरबंद झाला असला तरी, मादी बिबट्या अजूनही परिसरात असल्याने नागरिकांमध्ये चिंता कायम आहे. त्यामुळे सरपंच सतिश जोशी, योगेश जोशी, किशोर वाडगे, ज्ञानेश्वर वाडगे, गणेश जोशी, राजु जोशी, निलेश तागड, गणेश तागड, डॉ. साळवे, कारभारी जोशी, दीपक पर्वत, बाळासाहेब तागड, बाबासाहेब वाडगे, संजय जोशी, गोरक्षनाथ गिते, योगेश साळवे, शंकर जोशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी, उर्वरित बिबट्यांनाही जेरबंद करण्यासाठी त्वरित आणखी पिंजरे लावावे अशी एकमुखी मागणी केली आहे.
दरम्यान नागरिकांसह लहान मुलांनी बिबट्या पासून संरक्षण व्हावे यासाठी अत्यावश्यक काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.