लोहारे - मिरपुर उड्डाणपुलासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा
◻️ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे - मिरपुर येथील श्रीक्षेत्र अवजिनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सोयीसुविधांसाठी नांदूर शिंगोटे - कोल्हार या राष्ट्रीय महामार्गावर लोहारे - मिरपुर येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे तसेच दूरध्वनीवरून पाठपुरावा केला आहे.
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील श्रीक्षेत्र अवजिनाथ बाबा हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, विविध विकासकामे तसेच मागील वर्षी ५० लाख रुपयांच्या निधीतून भक्त निवासाची उभारणी करण्यात आली आहे. या विकासकामांमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दरवर्षी यात्रेनिमित्त लाखो भाविक येथे येतात, तसेच दैनंदिन ही मोठी वर्दळ असते. मंदिरालगत असलेल्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून हा रस्ता मंदिराच्या अगदी जवळून जात आहे. त्यामुळे मंदिर परिसराची जागा कमी होणार असून, भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीची कोंडी व अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिक व भाविकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे लोहारे - मिरपुर येथे उड्डाणपूल मंजूर करण्याची मागणी केली असून नांदूर शिंगोटे - कोल्हार राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पात मिरपुर येथील उड्डाणपुलाचा समावेश करण्याची विनंती केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांच्या या पाठपुराव्याबद्दल लोहारे, मिरपुर व तळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन केले आहे.