संगमनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली तांबे यांची विक्रमी मतांनी निवड
◻️“शहराचा विकास, स्वच्छता आणि पारदर्शकता हेच माझे ध्येय”
संगमनेर LIVE | संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एक नवा इतिहास रचला गेला आहे. डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांनी राज्यभरात सर्वाधिक मतांनी विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांच्या या विजयाने राजकीय वर्तुळात आणि शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
उच्चशिक्षित आणि बहुभाषिक व्यक्तिमत्व
मूळच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील असलेल्या डॉ. मैथिली तांबे यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्या व्यवसायाने दंतचिकित्सक (BDS) असून त्यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमधून ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए'चे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'मधून 'स्कूल मॅनेजमेंट अँड लीडरशिप'चे प्रमाणपत्रही प्राप्त केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ अशा चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने त्या सर्वांशी सहज संवाद साधतात. त्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य सत्यजीत तांबे यांच्या पत्नी आहेत.
सामाजिक कार्याचा वारसा
डॉ. मैथिली तांबे यांनी ‘ग्रामोदय ट्रस्ट'च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या “आय लव्ह संगमनेर” या उपक्रमाला शहरातील तरुण आणि महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, लोकांशी असलेले त्यांचे घट्ट नातेच त्यांच्या विजयाचे मुख्य कारण ठरले आहे.
व्यावसायिक अनुभव आणि नेतृत्व कौशल्य
डॉ. मैथिली यांनी पुण्यातील 'द अकॅडमी स्कूल' (TAS) येथे सीईओ (CEO) म्हणून काम करताना आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली आहे. त्यांनी तिथे शाळेच्या कामकाजात आधुनिकता आणली, कर्मचारी सक्षमीकरण आणि कार्यक्षमतेवर आधारित पुनरावलोकन पद्धती लागू केली, त्या आरोग्य, शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्थांना 'व्हिजन-बेस्ड मॅनेजमेंट' आणि धोरणात्मक नियोजनासाठी कन्सल्टन्सी प्रदान करणे असे उपक्रम राबवले आहेत.
भविष्यातील स्वच्छ आणि सुसज्ज संगमनेर
नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहराचा सर्वागीण विकास करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. त्यांच्या व्हिजनमध्ये पारदर्शक आणि उत्तरदायी कारभार, आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आणि स्वच्छ शहर, युवक आणि महिलांना प्रगतीच्या नव्या वाटा उपलब्ध करून देणे या गोष्टीचा प्रामुख्याने समावेश आहे.
शांत स्वभाव, समजूतदारपणा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे डॉ. मैथिली तांबे यांच्याकडून संगमनेरच्या विकासाची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात असून “शहराचा विकास, स्वच्छता आणि पारदर्शकता हेच माझे ध्येय आहे” असे डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.