संगमनेरच्या जनतेने निवडणूकीत दिलेला कौल मान्य!
◻️शहर विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. ही निवडणूक म्हणजे धनशक्ती आणि दडपशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढत होती. निकाल अपेक्षेप्रमाणे नसला तरी, शहर विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
आमदार अमोल खताळ म्हणाले, शिवसेना - महायुतीने या निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्याना आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देऊन त्यांना सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आमचे उमेदवार अत्यंत ताकदीने लढले. ही लढाई 'धनशक्ती' विरुद्ध 'जनशक्ती' अशी होती. स्थानिक पातळीवर दबावतंत्राचा वापर झाला, हे सूज्ञ मतदारांनी पाहिले आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जनतेने आमदार म्हणून संधी दिली. त्याच विश्वासातून शहराच्या आणि तालुक्याच्या विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत आणि भविष्यातही ही विकासाची गती कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात जय - पराजय होत असतो. या निकालाचे पक्षस्तरावर आत्मपरीक्षण केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण केले जाईल. असे सांगताना “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे या निवडणुकीने पुन्हा सिद्ध केले आहे. पराभवाने आमचे मनोबल खचणार नाही. महायुती आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.” असे देखील आमदार खताळ म्हणाले आहेत.
दरम्यान निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व मतदार बंधू - भगिनींचे आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिवसेना - महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आमदार खताळ यांनी आभार मानले आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका नेहमीच सकारात्मक आणि बांधिल राहील, असे त्यांनी शेवटी नमूद केले.