थोरात आणि तांबेचा बालेकिल्ला अभेद्य! संगमनेर २.० व्हिजनला जनतेचा ‘कौल’

संगमनेर Live
0
थोरात आणि तांबेचा बालेकिल्ला अभेद्य! संगमनेर २.० व्हिजनला जनतेचा ‘कौल’

◻️ डॉ. मैथिली तांबे नगराध्यक्ष पदी राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी!


​संगमनेर LIVE | राजकारण आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याची संस्कृती जपणाऱ्या संगमनेर तालुक्याने आपली मागील चूक दुरुस्त केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास व्यक्त करत, संगमनेरकरांनी सेवा समितीच्या २७ उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. विशेष म्हणजे, डॉ. मैथिली सत्यजीत तांबे या संपूर्ण राज्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या उमेदवार ठरल्या आहेत.

​लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सलग आठ वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करून संगमनेरचा कायापालट केला आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाची खंत संपूर्ण तालुक्याला होती. गेल्या वर्षभरात शहरात वाढलेली गुंडागिरी, अमली पदार्थांची तस्करी आणि फ्लेक्सबाजीमुळे त्रस्त झालेल्या जनतेने अखेर ‘सुसंस्कृत राजकारणा’ला पसंती दिली आहे. अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती.

​आमदार सत्यजीत तांबे यांचे अचूक नियोजन आणि त्यांनी मांडलेले ‘संगमनेर २.०' हे विकासाचे व्हिजन तरुणाईला आणि सर्वसामान्य संगमनेरकरांना भावले आहे. डॉ. मैथिली तांबे या उच्चशिक्षित असून थोरात-तांबे घराण्याचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे चालवतील, या विश्वासातून त्यांना तब्बल १६,७७७ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले आहे.

​या निवडणुकीत मंत्री विखे आणि आमदार खताळ गटाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या सभांचाही कोणताही परिणाम झाला नाही. बाळासाहेब थोरात यांनी ‘बाजीप्रभू’ प्रमाणे एकहाती खिंड लढवत विरोधकांच्या फौजेला रोखले आणि संगमनेर हा थोरातांचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध केले.

“सर्व समाज आणि संघटनांच्या पाठबळामुळे हा अभूतपूर्व विजय मिळाला आहे. संगमनेरच्या जनतेने विकासाच्या आणि सुसंस्कृत राजकारणाच्या बाजूने कौल दिला आहे.” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

​निकालाची अधिकृत घोषणा होताच संगमनेर शहरात तरुणाईचा महापूर लोटला होता. गुलालाची उधळण, कानठळ्या बसवणारी फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेच्या तालावर निघालेल्या भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमून गेले. हा विजय केवळ एका पक्षाचा नसून संपूर्ण संगमनेरकरांच्या अस्मितेचा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !